
पुणे : महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी 10 वा सामना झाला. ईगल नाशिक टायटन्स आणि रत्नागिरी जेट्सची टीम आमने-सामने होती. ईगल नाशिक टायटन्स टीमने आतापर्यंत या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केलीय. साखळी फेरीतील तीन पैकी तीन सामने जिंकत अव्वल स्थानी आहे. राहुल त्रिपाठी आणि अर्शिन कुलकर्णी या दोन खेळाडूंवर नाशिकची टीम प्रामुख्याने अवलंबून आहे. राहुल त्रिपाठी टीम इंडियाकडून खेळतो.
कालच्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सची टीम शतकवीर अर्शिन कुलकर्णीशिवाय मैदानात उतरली होती. ईगल नाशिक टायटन्सच्या या आधीच्या सामन्यात अर्शिन कुलकर्णीने पुणेरी बाप्पा टीम विरुद्ध 54 चेंडूत 117 धावा फटकावल्या. यात त्याने 3 फोर, 13 सिक्स होते.
धीरज फटांगरेने किती धावा केल्या?
रत्नागिरी जेट्स विरुद्धच्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स टीमला MPL 2023 स्पर्धेत पहिला झटका बसला. नाशिकची विजयी घोडदौड रत्नागिरी जेट्सने रोखली. या मॅचमध्ये रत्नागिरी जेट्सने पहिली बॅटिंग केली. ओपनर धीरज फटांगरेने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 51 चेंडूत 70 धावा फटकावल्या. यात 6 फोर, 4 सिक्स होते. प्रीतम पाटील 19 चेंडूत 33 आणि निखिल नाईकने 28 चेंडूत 41 धावा केल्या. या तिघांच्या फलंदाजीच्या बळावर रत्नागिरी जेट्सने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 200 धावा चोपल्या.
मंदार भंडारी 8 फोर, 4 सिक्स
या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ईगल नाशिक टायटन्स टीमला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. 32 धावांवर हर्षद खाडीवलेच्या रुपाने पहिला झटका बसला. त्याने 9 चेंडूत 8 धावा केल्या. विकेटकीपर मंदार भंडारीने मात्र जबरदस्त प्रदर्शन केलं. सलामीला आलेल्या मंदारने 39 चेंडूत 74 धावा चोपल्या. त्याने 8 फोर, 4 सिक्स मारले. राहुल त्रिपाठीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. राहुल त्रिपाठीने 20 चेंडूत 24 धावा केल्या.
कोण जिंकलं?
कौशल तांबेने 17 चेंडूत 22 धावा केल्या. धनराज शिंदेने अखेरीस फटकेबाजी केली. 3 सिक्स, 2 फोरसह नाबाद 43 धावा केल्या. पण त्याला विजयी लक्ष्य गाठता आलं नाही. नाशिकने 5 बाद 188 धावा केल्या. रत्नागिरीने नाशिकवर 12 धावांनी विजय मिळवला. रत्नागिरीकडून अजीम काझीने 4 ओव्हर्समध्ये 29 धावा देऊन 3 विकेट काढल्या.