ICC WWC 2022: पाकिस्तानची पराभवाची हॅट्रिक, रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय

| Updated on: Mar 11, 2022 | 1:54 PM

आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Womens world cup) आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (Pakistan vs South Africa) झालेला सामना रोमांचक ठरला.

ICC WWC 2022: पाकिस्तानची पराभवाची हॅट्रिक, रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला सहा धावानी हरवलं
Image Credit source: icc
Follow us on

ऑकलंड: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Womens world cup) आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (Pakistan vs South Africa) झालेला सामना रोमांचक ठरला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला नमवून आपला विजयाचा सिलसिला कायम राखला. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा अवघ्या सहा रन्सनी पराभव केला. पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आधी पाकिस्तान महिला संघाचा भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाने पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेने सलग दुसरा विजय मिळवला आहे. याआधी त्यांनी बांगलादेशवर 32 धावांनी विजय मिळवला होता. स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचा पुढचा मार्ग खडतर बनला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान समोर विजयासाठी 224 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. पाकिस्तानची संपूर्ण टीम या लक्ष्याचा पाठलाग करताना 217 रन्सवर ऑलआऊट झाली.

सामना शेवटपर्यंत रंगतदार स्थितीत पोहोचला होता. कोण जिंकेल, हे शेवटपर्यंत सांगता येत नव्हतं. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता होती. दोन विकेट शिल्लक होत्या.

दक्षिण आफ्रिकेकडून शबनिम इस्माइलने गोलंदाजी करत होती. तिच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा निघाल्या. पुढच्याच चेंडूवर इस्माइलने पाकिस्तानला धक्का देत नववी विकेट काढली. डायना बेग आऊट होऊन तंबूत परतली. त्यानंतर पुढच्या चेंडूवर सिंगल धाव निघाली. पाकिस्तानला शेवटच्या तीन चेंडूत विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. लक्ष्यापर्यंत पाकिस्तानी संघ पोहोचेल असं वाटत होतं. पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचे इरादे थोडे वेगळे होते. तिने चौथा चेंडू डॉट टाकला व पाचव्या चेंडूवर शेवटचा विकेट काढून सामना जिंकला.