South Africa vs New Zealand: 44 चेंडूत 4 वेळा क्विंटन डीकॉकने विकेट फेकली, अक्षरश: केलं सरेंडर

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने दक्षिण अफ्रिकेच्या वाटेला फलंदाजी आली. महत्त्वाच्या सामन्यात क्विंटन डीकॉकने सुमार फलंदाजीचं दर्शन घडवलं.

South Africa vs New Zealand: 44 चेंडूत 4 वेळा क्विंटन डीकॉकने विकेट फेकली, अक्षरश: केलं सरेंडर
South Africa vs New Zealand: 44 चेंडूत 4 वेळा क्विंटन डीकॉकने विकेट फेकली, अक्षरश: केलं सरेंडर
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 04, 2026 | 8:20 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिला उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दुसऱ्या डावात दव फॅक्टर लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेवर आधीच दडपण वाढलं. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. कारण याच मैदानात भारताने 196 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. पण दक्षिण अफ्रिकेला चांगली सुरूवात करून देण्यात सपशेल अपयश आलं. दक्षिण अफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. क्विंटन डीकॉकच्या सुमार फलंदाजीचा फटका दक्षिण अफ्रिकेला बसला आणि संघावरील दबाव वाढला. क्विंटन डीकॉकने 8 चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारत 10 धावा केल्या. पण त्याने फिरकीपटू कोल मॅककोन्ची यांच्यासमोर सरेंडर केलं. त्याने क्विंटन डीकॉकच्या कमकुवत बाजूचा पुरेपूर फायदा घेतला.

क्विंटन डीकॉक टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑफ स्पिनरसमोर पहिल्यांदा आऊट झालेला नाही. यापूर्वीही त्याने अशीच चूक केली आहे. त्यातून काही धडा घेतला नाही. क्विंटनने या स्पर्धेत ऑफ स्पिनर्सच्या 44 चेंडूंचा सामना केला आणि 54 धावा केल्या. पण चार वेळा विकेट दिली. ऑफ स्पिनर्सविरुद्ध क्विंटन डीकॉकची सरासरी फक्त 13.5 इतकी आहे. इतकंच काय 44 चेंडूंपैकी 20 चेंडू निर्धाव गेले आहेत. त्याची विकेट झटपट गेल्याने दक्षिण अफ्रिकेच्या धावगतीला ब्रेक बसला. या मैदानात सामना जिंकायचा असेल तर 200 च्या आसपास धावा असणं आवश्यक आहे.

क्विंटन डीकॉकने उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात चूक केली आणि संघाला खड्ड्यात टाकलं. खरं तर त्याने पहिल्या षटकात उत्तुंग षटकार मारला होता आणि आपला हेतू स्पष्ट केला होता. पण ऑफ स्पिनर्ससमोर नांगी टाकली. कमकुवत बाजू माहिती असताना सावध खेळण्याऐवजी आक्रमक फटका मारल आणि विकेट देऊन बसला. ईडन गार्डन्सच्या मैदानात क्विंटन डीकॉकचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. त्याने या मैदानात 10 डावात 95 धावा केल्या आहेत. यात 110.46 च्या स्ट्राईक रेटने सर्वोत्तम 28 धावा केल्या आहेत.

Follow Us