
आयपीएलच्या 18 व्या पर्वासाठी सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राजस्थान रॉयल्स हा संघ देखील यात मागे नाही. आयपीएलच्या पहिल्या पर्वात विजय मिळवल्यानंतर 16 पर्वात राजस्थानची जेतेपदाची झोळी रिती राहिली आहे. 2022 साली राजस्थान अंतिम फेरीत धडक मारली होती. पण गुजरात टायटन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर मागच्या पर्वात एलिमिनेटर फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभूत करत पुढचा मार्ग रोखला होता. असं असताना फ्रेंचायझीने आता प्रशिक्षकाची जबाबदारी राहुल द्रविडच्या खांद्यावर टाकली आहे. त्यामुळे संघाचं रुपडं पालटणार यात शंका नाही. आयपीएल 2025 मेगा लिलावात चांगल्या खेळाडूंसाठी फिल्डिंग लावली जाईल. दुसरीकडे, संजू सॅमसनला रिटेन करणार की रिलीज या बातम्यांना उधाण आलं आहे. असं असताना प्रशिक्षक राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेताच कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे. राहुल द्रविडला एक फोन आला आणि त्याने थेट एका शब्दातच कर्णधारपदाचा विषय संपवून टाकला आहे.
राहुल द्रविड एका चेअरवर पाठमोरा बसला आहे. नेमका तेव्हाच त्याचा फोन वाजतो आणि त्यावर नाव असतं संजू सॅमसन याचं..राहुल द्रविड फोन उचलतो आणि म्हणतो ‘हॅलो कॅप्टन’…याचा अर्थ स्पष्ट आहे की राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझी संजू सॅमसनला रिटेन करणार आहे आणि त्याच्याकडेच कर्णधारपदाची धुरा असेल. पण यावर्षी त्याला अनुभवी राहुल द्रविडचं मार्गदर्शन लाभणार आहे. आयपीएलचं पहिलं पर्व राजस्थान रॉयल्सने आपल्या नावे केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत चषकासाठी आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 6, 2024
राहुल द्रविडने 2012 आणि 2013 या पर्वात राजस्थान रॉयल्स संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. त्यानंतर 2014 आणि 2015 या कालावधीत संघाचा मेंटॉरही राहिला आहे. दिल्लीचा मेंटॉर असताना त्याच्या कारकिर्दित संजू सॅमसनला ओळख मिळाली होती. आता पुन्हा एकदा राहुल द्रविड आणि संजू सॅमसन ही जोडी एकत्र दिसणार आहे. टीम इंडियात असताना राहुल द्रविडला हवी तशी संधी मिळाली नव्हती. पण आता संजू सॅमसन कर्णधार आणि राहुल द्रविड प्रशिक्षक असल्याने काय रणनिती असणार याकडे लक्ष लागून आहे.