RCB ला मोठा धक्का! पहिल्या सामन्यापासूनच्या प्रवासातील जुना साथीदार काळाच्या पडद्याआड; फ्रँचायझीची भावुक पोस्ट
Royal Challengers Bengaluru Drummer News: आरसीबीसाठी हा एक मोठा धक्का आहे. एका अनुभवी दिग्गजाने जगाचा निरोप घेतला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूमध्ये ‘कन्नड शिवमणी’ या नावाने ओळखले जाणारे ड्रमर देवा यांचे निधन झाले आहे. ते एक लोकप्रिय तालवादक होते. ज्यांच्या दमदार तालांनी कन्नड चित्रपटसृष्टीला ऊर्जा दिली आहे. त्यांनी चिन्नास्वामी स्टेडियममधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. ते रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसोबत पहिल्या सामन्यापासून जोडले गेले होते. त्यांच्या जाण्याने आरसीबीमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने एक भावूक पोस्ट केली आहे.
देवा यांनी सामान्य परिस्थितीतून वर येत सँडलवूडमधील एक महत्त्वाचे नाव आणि सामन्याच्या दिवशीचे आवडते कलाकार म्हणून नाव कमावले. प्रदीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर ६४ वर्षीय देवा यांचे २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री उशिरा राजराजेश्वरी नगर येथील त्यांच्या घरी निधन झाले आहे. बंगळूरने देवा यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे. देवा ड्रम वाजवत असलेल्या काही फोटोंसोबत त्यांच्या आठवणीत एक भावनिक कॅप्शनही शेअर करण्यात आले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचे दीर्घकाळ सदस्य असलेल्या देवा यांना आरोग्याच्या समस्या होत्या. फ्रँचायझीने म्हटले आहे की, आरोग्याच्या समस्यांमुळे आम्ही देवा यांना गमावले आहे. ते आरसीबी परिवाराचा एक अविभाज्य भाग होते. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या आयपीएल सामन्यापासून ते स्टेडियममध्ये घालवलेल्या अनेक अविस्मरणीय रात्रींपर्यंत, देवाचे ड्रम्स हे आरसीबीच्या सामन्याच्या दिवसाच्या अनुभवाचा एक अविभाज्य भाग राहिले आहेत, असं आरसीबीने म्हटलं आहे.
View this post on Instagram
भावनिक पोस्टमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने पुढे म्हटले आहे की, काल वयाच्या ६४ व्या वर्षी प्रकृतीच्या कारणांमुळे आम्ही देवा यांना गमावले, ज्यांना कन्नडमध्ये प्रेमाने ‘शिवमणी’ म्हटले जायचे. देवा यांचे संगीत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कायम घुमत राहील आणि ते नेहमीच आरसीबीच्या इतिहासाचा एक भाग राहतील. इतकी वर्षे आमचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद. देवा, तुमच्या आत्म्यास शांती लाभो, असं म्हणत संघाने भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कट्टर चाहता असल्याने देवा आयपीएलच्या घरच्या सामन्यांदरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर एक अविभाज्य भाग बनला होते. त्यांचे जोशपूर्ण लाईव्ह ड्रम सोलो हजारो चाहत्यांना जागेवरून उठून नाचायला लावण्यात कधीही कमी पडले नाहीत. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. स्टँड्समधील ऊर्जा वाढली. ते पहिल्या दिवसापासून हे करत होते. अगदी आयपीएलच्या उद्घाटन हंगामात आरसीबीसाठी सादरीकरण करत होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी तेच ताल इतर क्रिकेट स्पर्धांमध्येही आणले होते. ज्यामुळे ते चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामापलीकडेही एक अत्यंत प्रिय असा मॅचडे आयकॉन बनले होते.
