Rishabh Pant: ऋषभ चुकांमधून शिकला, आज आक्रमक पण बेजबाबदार नाही, टीकाकाराचं बॅटने तोंड केलं बंद

ऋषभने त्याच्या अर्धशतकी खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार विराट कोहलीसह त्याने पाचव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली.

Rishabh Pant: ऋषभ चुकांमधून शिकला, आज आक्रमक पण बेजबाबदार नाही, टीकाकाराचं बॅटने तोंड केलं बंद
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 5:26 PM

नवी दिल्ली: मागच्या काही काळापासून सातत्याने टिकेचा सामना करणारा भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतची (Rishabh Pant) बॅट अखेर आज केपटाऊनवर तळपली. लंचआधी ऋषभने अर्धशतक झळकावलं. त्याने टेस्टमध्ये आज वनडेसारखी (ODI) फलंदाजी केली. 60 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं. हीच पंतच्या फलंदाजीची खासियत आहे. त्यामुळे त्याला नैसर्गिक आक्रमक फलंदाज म्हटलं जातं. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावात पंत बेजबाबदार फटका खेळून बाद झाला होता. त्यामुळे गावस्करांसह अन्य क्रिकेटपटूंनी त्याला जोरदार झापलं होतं.

ऋषभने आज चांगल्या फटक्यांची निवड केली, असं माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी म्हटलं आहे. ऋषभने त्याच्या अर्धशतकी खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार विराट कोहलीसह त्याने पाचव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. आज संघाला गरज असताना त्याने हा खेळ दाखवला. पंत मैदानावर आला, तेव्हा प्रचंड दबाव होता. पुजारा आणि रहाणे पाठोपाठ बाद होऊन तंबूत परतले होते.

वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर फलंदाजी करणं इतकं सोप नव्हतं. तिसऱ्या कसोटीआधी ऋषभ पंत बरोबर चर्चा केल्याचं राहुल द्रविड आणि विराट कोहलीने सांगितलं होतं. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळात ऋषभने एकही बेजबाबदार फटका खेळला नाही. खराब चेंडूंवर त्याने प्रहार केला. “ऋषभ पंत त्याच्या पद्धतीने फलंदाजी करतोय. आजचा त्याचा खेळ आक्रमक असला, तरी बेजबाबदारपणाचा नाहीय. ऋषभकडून ही तुम्ही अपेक्षा करु शकता” असे आकाश चोप्राने सांगितले.