Shefali Verma : संघातून वगळलं, तो काळ म्हणजे…; सुवर्णपदकानंतर शेफाली वर्मा भावूक, तेंव्हा काय करत होती? सगळं सांगितलं

संघातून वगळण्यात आल्यानंतरचा काळ हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात दुःखाचा क्षण होता, असे शेफाली वर्माने सांगितले. स्वतःवर मेहनत घेत मानसिक आरोग्य, कौशल्य आणि फिटनेसवर भर दिल्याचेही तिने स्पष्ट केले.

Shefali Verma : संघातून वगळलं, तो काळ म्हणजे...; सुवर्णपदकानंतर शेफाली वर्मा भावूक, तेंव्हा काय करत होती? सगळं सांगितलं
Shafali Verma Asian Games Gold
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 8:39 PM

भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दणदणीत विजयात भारताची धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्माने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. जेएसडब्ल्यूने आयोजित केलेल्या मीडिया राऊंडटेबलमध्ये आयएएनएसशी संवाद साधताना शेफाली आपल्या प्रवासावर मनमोकळेपणाने व्यक्त झाली आहे. वन-डे विश्वचषक जिंकल्यापासून महिला क्रिकेटने खऱ्या अर्थाने मोठी झेप घेतली असल्याचे तिने सांगितले.

शेफाली म्हणाली, “आम्ही जेव्हा वन-डे विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली होती, तो क्षण अविस्मरणीय होता. तेव्हापासून भारतीय महिला क्रिकेट खूप पुढे गेले आहे. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत.”

जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अनुभवाबद्दल सांगताना ती म्हणाली, “जपानमध्ये आम्हाला इतक्या उत्तम सुविधा मिळतील याचा आम्ही विचारही केला नव्हता. जपानने ज्या प्रकारे आम्हाला भक्कम पाठिंबा दिला आणि मैदानावर सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्याचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे. महिला क्रिकेटबाबतचे हे गांभीर्य पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि देशासाठी आणखी चांगली कामगिरी करण्याची नवी प्रेरणा मिळाली.”

संघातून वगळण्यात आल्याच्या त्या कठीण काळाबद्दल बोलताना शेफाली भावूक झाली होती. “जेव्हा मला संघातून बाहेर काढले, तो माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात दुःखाचा क्षण होता. तो काळ अतिशय आव्हानात्मक होता. मात्र, मी ती परिस्थिती स्वीकारली आणि स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली. मला सिद्ध करायचे होते की मी देशासाठी आणि संघासाठी सर्वोत्तम आहे.”

या काळात मानसिक आरोग्य, कौशल्य आणि फिटनेसवर विशेष भर दिल्याचे शेफालीने सांगितले. “माझ्या कुटुंबाने मला भक्कम साथ दिली. जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकला, तेव्हा माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. पदक किंवा ट्रॉफी जिंकल्यावर मला माझ्या सर्व कष्टांची आठवण येते. देशासाठी घाम गाळणे आणि संघासाठी सर्वस्व अर्पण करणे, याहून अभिमानाचा क्षण एका खेळाडूसाठी दुसरा असूच शकत नाही.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us