T20 WC 2026, AUS vs IRE : ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, आयर्लंडला 67 धावांनी नमवलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 14व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडला सहज पराभवाची धूळ चारली. यासह स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.

T20 WC 2026, AUS vs IRE : ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, आयर्लंडला 67 धावांनी नमवलं
AUS vs IRE : ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
Image Credit source: Ireland Cricket Twitter
| Updated on: Feb 11, 2026 | 6:30 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना आयर्लंडशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 182 धावा केल्या. तसेच विजयासाठी 183 धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव गडगडला. आयर्लंडला 115 धावांपर्यंत मजल मारता आणि सामना 67 धावांनी गमावला.  या विजयासह ऑस्ट्रेलियाने ब गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.  ऑस्ट्रेलियाचे 2 गुण असून नेट रनरेट हा +3.350 इतका आहे. त्यामुळे या गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने महत्त्वाच्या विकेट पावरप्लेमध्ये गमावल्या. आयर्लंडने 6 षटकात 40 धावा केल्या आणि 4 विकेट गमावल्या. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग पहिल्याच चेंडूवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर संघाच्या 13 धावा असताना धडाधड दोन विकेट पडल्या. हॅरी टेक्टरला खातंही खोलता आलं नाही. मॅथ्यू कुन्हेमनच्या गोलंदाजीवर कॅमरून ग्रीनने त्याचा झेल पकडला. त्यानंतर रॉस अडेर 12 धावांवर असताना नाथन एलिसच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. कर्लिस कॅम्पर 4, बेंजामिन कॅलिट्झ 2 आणि गॅरेथ डेलाना 11 धावा करून तंबूत परतले. लोरकन टकर आणि जॉर्ज डॉकरेलने चांगली भागीदारी केली. सहाव्या विकेटसाठी या जोडीने 46 धावा केल्या. पण ही जोडी फुटली आणि पराभव निश्चित झाला. लोरकन टकर 24 आणि जॉर्ज डॉकरेल 41 धावा करून बाद झाले. त्यानंतर तळाचे उर्वरित फलंदाजी झटपट बाद झाले.

ऑस्ट्रेलियाची सुरुवात पण काही चांगली झाली नाही. कर्णधार ट्रेव्हिस हेड 6 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर जोश इंग्लिस आणि कॅमरून ग्रीन यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटली आणि धावगतीला ब्रेक लागला. कॅमरून ग्रीन 21 धावा करून बाद झाला आणि त्यानंतर जोश इंग्लिसची विकेट पडली. त्याने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेल काही खास करेल अशी अपेक्षा होती. पण त्याची बॅट काही चालली नाही आणि 9 धावा करून बाद झाला. मार्कस स्टोयनिसने 45 धावा केल्या. तर कुपर कॉनोली नाबाद 11 आणि झेव्हियर बार्टलेट नाबाद 11 धावांवर राहिले.