
T20 वर्ल्ड कप 2024 चा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. सेंट लूसिया येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुपर-8 राऊंडचा दुसरा सामना झाला. या मॅचमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 8 विकेट राखून आरामात विजय मिळवला. वेस्ट इंडिजने पहिली बॅटिंग केली. त्यांनी इंग्लंडसमोर विजयासाठी 181 धावांच टार्गेट ठेवलं होतं. इंग्लंडने 15 चेंडू राखून आरामात विजय मिळवला. फिल सॉल्ट इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने वेस्ट इंडिजची गोलंदाजी अक्षरक्ष: कुटून काढली. 47 चेंडूत 185 च्या स्ट्राइक रेटने तुफानी 87 धावा फटकावल्या. इंग्लंडच्या या विजयात जॉनी बेयरस्टोने सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 26 चेंडूत 184 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 48 धावा केल्या. सॉल्टला त्याने चांगली साथ दिली. फिल सॉल्टने त्याच्या नाबाद 87 धावांच्या खेळीत 7 फोर, 5 सिक्स मारले. जॉनी बेयरस्टोने त्याच्या नाबाद 48 धावांच्या खेळीत 5 फोर, 2 सिक्स मारले.
सेंट लूसियाची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजला बिनबाद 40 अशी चांगली सुरुवात मिळाली होती. पण ब्रँडन किंग 23 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर सांघिक प्रयत्नांच्या बळावर वेस्ट इंडिजने 180 धावांपर्यंत मजल मारली. चार्ल्स (38), पूरन (36), पॉवेल (36) आणि रुदरफोर्ड (28) यांनी योगदान दिलं.
सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा
181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडच्या ओपनर्सनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. पावरप्लेमध्ये स्पिनर अकील हुसैनने त्यांना जखडून टाकलं. जॉस बटलरने 22 चेंडूत 25 धावा केल्या. पण तो संघर्ष करताना दिसला. रॉस्टन चेजच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेला मोईन अली सुद्धा फार काही करु शकला नाही. 10 चेंडूत 13 धावा करुन तो पॅव्हेलियनमध्ये परतला. क्रीजवर जॉनी बेयरस्टो उतरताच वेगाने धावा सुरु झाल्या. इंग्लंडच्या टीमला एक लय सापडली. सॉल्टने सुद्धा मग आक्रमक फलंदाजी सुरु केला. दोघांच्या बॅटिंगमुळे मॅच एकतर्फी झाली. इंग्लंडने आरामात विजय मिळवला.
वेस्ट इंडिजच्या पराभवाच प्रमुख कारण काय?
वेस्ट इंडिजला टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. डॉट बॉल हे वेस्ट इंडिजच्या पराभवाचा एक प्रमुख कारण ठरलं. वेस्ट इंडिजने त्यांच्या इनिंगमध्ये 51 डॉट चेंडू म्हणजे जवळपास 9 ओव्हर निर्धाव खेळल्या. अखेरीस ते त्यांच्या पराभवाच एक कारण आहे.