
पापुआ न्यू गिनीच्या एका खेळाडूवर दरोड्याचा गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. या खेळाडूचं नाव आहे किपलिंग डोरिगा.. हा खेळाडू पापुआ न्यू गिनीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. दोन टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने भाग घेतला आहेत. तसेच वर्ल्ड रेकॉर्डही नावावर आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या या खेळाडूच्या नावावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. किपलिंग डोरिगा याच्यावर जर्सीच्या कॅपिटल सेंट हेलियर्समध्ये झालेल्या एका घटनेत दरोड्याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार, किपलिंग डोरिगाने न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सेंट हेलियर्समध्ये दरोड्याचा गुन्हा 25 ऑगस्टच्या सकाळी घडला होता. किपलिंगवरील आरोप खूपच गंभीर असल्याने हे प्रकरण न्यायालयाने रॉयल कोर्टात वर्ग केलं आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. डोरिगाचा जामीन अर्ज फेटाळला असून त्याला या तारखेपर्यंत ताब्यात ठेवलं जाणार आहे. पापुआ न्यू गिनी संघ क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेट चॅलेंज लीगसाठी गेला होता. किपलिंग डोरिगा देखील या संघासोबत गेला होता.
किपलिंग डोरिकाने 2017 मध्ये पापुआ न्यू गिनीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. किपलिंग डोरिगाने 2017 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. किपलिंग डोरिगा हा एक विकेटकीपर फलंदाज आहे. त्याने पापुआ न्यू गिनीसाठी अनेक महत्त्वाचे सामने खेळले आहेत. दरम्यान वानुआतुविरुद्ध खेळताना त्याने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने एकाच सामन्यात पाच झेल घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे डोरिगा सध्या खेळल्या जाणाऱ्या सीडब्ल्यूसी चॅलेंज लीगच्या दुसऱ्या फेरीत पापुआ न्यू गिनी संघाचा भाग आहे.
किपलिंग डोरिगाने 39 वनडे सामन्यातील 38 डावात 20.27 च्या सरासरीने 730 धावा केल्या आहेत. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 43 टी20 सामन्यात 12.37 च्या सरासरीने 359 धावा केल्या आहेत. यात नाबाद 46 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. डोरिगा 2021 आणि 2024 मध्ये दोनदा आयसीसी टी20 विश्वचषक खेळला आहे. 2021 च्या पर्वात त्याने तीन सामन्यांमध्ये 64 धावा केल्या तर 2024 च्या पर्वात त्याने चार सामन्यांमध्ये 71 धावा केल्या आहेत.