
यजमान आणि गतविजेता टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत सलग 4 सामने जिंकले. त्यामुळे टीम इंडिया सुपर 8 फेरीतही अशीच कामगिरी करेल, असा विश्वास भारतीय चाहत्यांना होता. मात्र टीम इंडियाने सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना गमावला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडिया सुपर 8 फेरीतील दुसरा सामना झिंबाब्वे विरुद्ध खेळणार आहे. भारतासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने हा सामना करो या मरो असा आहे. टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा पहिल्या 3 सामन्यात झिरोवर आऊट झाला. तसेच अभिषेकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 फेरीतील सामन्यातही निराशा केली. त्यामुळे अभिषेकला झिंबाब्वे विरुद्ध डच्चू मिळणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेला संबोधित केलं. कोटक यांनी प्लेइंग इलेव्हनबाबत भाष्य केलंय. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट झालं आहे. उजव्या-डाव्या हाताने खेळणाऱ्या जोडीमुळे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना बॉलिंग करणं आव्हानात्मक ठरतं. त्यामुळे टीम मॅनजेमेंटकडून कायमच डाव्या-उजव्या हाताने खेळणाऱ्या जोडीला मैदानात पाठवण्याचा मानस असतो.
कोटक यांनी इशान किशन आणि अभिषेक शर्मा या दोघांना झिंबाब्वे विरुद्ध एकत्र न खेळवण्यावरुन भाष्य केलं. तसेच कोटक यांनी गोलंदाजीवरूनही प्रतिक्रिया दिली. आम्ही वरील 2 मुद्द्यांवर विचार करत आहोत, असं कोटक म्हणाले.
कोटक यांनी डाव्या-उजव्या जोडीबाबत भाष्य केलं. त्यामुळे डावं-उजवं समीकरण जुळवण्यासाठी 3 शक्यता आहेत. अभिषेक आणि इशान दोघेही डावखुरे आहेत. त्यामुळे सलग 4 सामन्यात फ्लॉप ठरलेल्या अभिषेकला डच्चू देण्यात येऊ शकतो. इशान किशन याच्या स्थानात बदल केला जाऊ शकतो. तसेच संजू सॅमसन याचा समावेशही केला जाऊ शकतो. अशात आता वरील 3 शक्यतांपैकी नक्की काय होतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडियाचा फिनिशर रिंकू सिंह त्याच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने घरी परतला आहे. त्यामुळे रिंकूच्या जागी संजूला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र रिंकु झिंबाब्वे विरूद्धच्या सामन्याआधी संघासह पुन्हा जोडला गेल्यास टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तसेच कोटक यांनी बॉलिंगमध्ये बदल करण्याबाबत विचार करत असल्याचं म्हटलं. आठव्या स्थानी ऑलराउंडरचा समावेश केला जाऊ शकतो, असंही कोटक म्हणाले. त्यामुळे इथे 1 बदल होणार असल्याचं दिसत आहे. कोटक यांनी म्हटल्यानुसार वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी अक्षर पटेल आठव्या स्थानी खेळू शकतो. अक्षरला बाहेर ठेवून सुंदरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी देण्यात आली होती. मात्र सुंदरने बॅटिंग आणि बॉलिंगने निराशा केली होती. त्यामुळे सुदंरला डच्चू मिळण्याचे हे संकेत आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
झिंबाब्वे विरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह.