
Superover World Record: टी20 क्रिकेटमध्ये अनेकदा थरारक सामने पाहण्याची संधी मिळते. कधी कधी न जिंकणाऱ्या सामन्यातही उलटफेर होतो. कधी शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळतो. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. असं असताना अनेकदा सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये जातो. टी20 क्रिकेट सुरू झाल्यापासून अनेकदा हा प्रसंग घडला आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत नुकताच सुपर ओव्हरने निकाल लागला. दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात एक नाही तर दोन सुपर ओव्हर झाल्या. यात दक्षिण अफ्रिकेने 4 धावांनी विजय मिळवला. टी20 क्रिकेटचा इतिहास पाहिला आणि त्यात सुपर ओव्हरचा निकाल पाहिला तर भारताचा दबदबा दिसून येत आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या सुपर ओव्हरमध्ये विजयाची चव चाखली आहे. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभूत करणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. भारताने आतापर्यंत सहा सामने सुपर ओव्हरमध्ये खेळले आणि जिंकलेही.
सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक पराभवाचा मानकरी हा न्यूझीलंडचा संघ आहे. आतापर्यंत न्यूझीलंडने 9 सामने सुपर ओव्हरचे खेळले आहे. यात सात वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर दोन सामन्यात विजय मिळाला आहे. इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेने प्रत्येकी दोन सुपर ओव्हर सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने तीन पैकी एक सामना जिंकला आणि 2 सामने गमावले आहेत. पाकिस्तानने चार पैकी 3 सामने गमावले. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेने दोन पैकी दोन सामने जिंकलेत. श्रीलंकेने सहा पैकी 4 सामने गमावले आहेत. तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर बांगलादेशच्या वाटेला कधी सुपर ओव्हरची वेळ आली नाही.