
तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमानंतर तामिळनाडूमध्ये टीएनपीएल आणि महाराष्ट्रात एमपीएल क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन्ही स्पर्धेत युवा खेळाडूंनी आतापर्यंत छाप सोडलीय. बुधवारी 21 जून रोजी चेपॉक सुपर गिलीज विरुद्ध डींडीगूल ड्रॅग्न यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आर अश्विन याच्या नेतृत्वात डींडीगूलने चेपॉकवर 1 रनने सनसनाटी विजय मिळवला. कॅप्टन म्हणून आर अश्विनला या सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
अश्विन अवघी 1 धाव करुन आऊट झाला. तर बॉलिंग करताना त्याला एकही विकेट घेता आली नाही. मात्र अश्विनने घेतलेली जबराट कॅच चर्चेचा विषय ठरलीय. अश्विनच्या सुपर कॅचचा व्हीडिओ राजस्थान रॉयल्स टीमने ट्विट केला आहे. अश्विन आयपीएलमध्ये राजस्थानडून खेळतो.
आर अश्विन तसा त्याच्या फिल्डिंगसाठी परिचित नाही. मात्र अश्विनने बुधवारी जे केलं, ते पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. अश्विनने घेतलेली कॅच पाहून सर्वांनाच धक्का लागला. सुपर गिलीज टीमच्या संजय यादव याने वरुण चक्रवर्ती याच्या बॉलिंगवर जोरदार फटका मारला. अश्विनने धावत सूर मारत अफलातून कॅच पकडला. अश्विनला बॅटिंग आणि बॉलिंगने अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आलं. मात्र अश्विनने एक कॅच घेत सर्व भरपाई केली.
आर अश्विन याची सुपर कॅच
ABCDE – Ash Bhai Can Do Everything ??✈️pic.twitter.com/XEq6tsQGzY
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 22, 2023
चेपॉक सुपर गिलीजने टॉस जिंकून डींडीगूल ड्रॅग्न टीमला बॅटिंगसाठी भाग पाडलं. डींडीगूल ड्रॅग्नकडून आदिथ्य गणेश याने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर सुबोथ भाटी याने 31 आणि सी सारथ कुमार याने 25 धावांचं योगदान दिलं. शिवम सिंह 21 धावा करुन बाद झाला. तर राहुल याने 20 रन्स केल्या. या पाचजणांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. डींडीगूल ड्रॅग्नने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. त्यामुळे चेपॉक सुपर गिलीजला विजयासाठी 171 धावांचं आव्हान मिळालं.
चेपॉकने या विजयी आव्हानांचा 19.5 ओव्हरपर्यंत शानदार पाठलाग केला. मात्र शेवटच्या बॉलवर अवघ्या 1 धावेने पराभव झाला. चेपॉककडून बाबा अपराजित याने 74 धावांची खेळी केली. कॅप्टन एन जगदीशनने 37 धावा केल्या. तर रामलिंगम रोहित 12 धावा करुन माघारी परतला. या तिघांशिवाय डींडीगूलच्या गोलंदाजांनी एकालाही दुहेरी आकडा गाठू दिला नाही. डींडीगूलकडून वरुण चक्रवर्थी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. पी कुमार याने 2 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर एस अरुण आणि सुबोथ भाटी या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
चेपॉक सुपर गिलीज प्लेइंग इलेव्हन | नारायण जगदीशन (कॅप्टन आणि विकेटकीपर), संतोष शिव, बाबा अपराजित, संजय यादव, उथिरासामी ससिदेव, एस हरीश कुमार, रामलिंगम रोहित, रॉकी भास्कर, राहिल शाह, एम सिलांबरसन आणि लोकेश राज.
डींडीगूल ड्रॅग्न प्लेइंग इलेव्हन | आर अश्विन (कर्णधार), राहुल, शिवम सिंह, बाबा इंद्रजित (विकेटकीपर), सुबोथ भाटी, एस अरुण, आदिथ्य गणेश, बोपाथी कुमार, एम माथिवन्नन, सी सारथ कुमार आणि पी सर्वना कुमार.