
ढाका | वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी अवघ्या 96 धावांचे आव्हान दिले होते. त्यामुळे हा सामना टीम इंडिया गमावणार, असं समजलं जात होतं. मात्र टीम इंडियाच्या रणरागिणींनी बांगलादेशला 87 धावांवर 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरलेल्या भारतीय खेळाडूंनी दमदार बॉलिंग केली. शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या दोघींनी सर्वाधिक प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर मिन्नू मनी हीने 2 आणि बारेड्डी अनुशा हीने 1 विकेट घेत बांगलादेशला विजयापासून रोखलं.
बांगलादेशकडून कॅप्टन निगर सुल्ताना हीने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. सुल्तानाने 55 बॉलमध्ये 2 चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. तर तिघींना भोपळाही फोडता आला नाही. सुल्ताना खातून झिरोवर नाबाद परतली. या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या एकीलाही दुहेरी आकडा गाठू दिला नाही.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाचे फलंदाज एका मागोमाग एक असे आऊट झाले. दुर्देवी बाब म्हणजे एकालाही 20 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. शफाली वर्मा हीने सर्वाधिक 19 धावा केल्या. अमनज्योत कौर हीने 14, स्मृती मंधाना 13, यास्तिका भाटीया 11 आणि दीप्ती शर्मा हीने 10 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 8 आणि हर्लीन देओल हीने 6 धावांचं योगदान दिलं. पूजा वस्त्राकर 7 आणि मिन्नू मनी 5 धावांवर नाबाद परतले. लाजीरवाणी बाब म्हणजे कॅप्टन हरमनप्रीत कौर पहिल्याच बॉलवर आऊट झाली. यासह हरमनप्रीतच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
हरमनप्रीतची झिरोवर आऊट होण्याची ही सहावी वेळ ठरली. यासह हरमनप्रीतच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. हरमनप्रीत टीम इंडियाकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारी पहिली बॅट्समन ठरली. हरमनप्रीतने याबाबतीत स्मृती मंधाना हीला मागे टाकलं. स्मृती 5 वेळा भोपळा न फोडता माघारी परतली आहे.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), बरेड्डी अनुषा, हरलीन देओल, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी आणि अमनजोत कौर.
वूमन्स बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शाठी राणी, शमीमा सुलताना, फहिमा खातून, रितू मोनी, शोभना मोस्तारी, शोर्ना अक्टर, नाहिदा अक्टर, मारुफा अक्टर, सुलताना खातून आणि राबेया खान.