आजवर भारताला जमलं नाही ते आता करावं लागणार! ३ शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजचा धडाका; टीम इंडियासमोर महाकाय लक्ष्य
India vs West Indies News: भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावानंतर त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.

आज गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिजने षटकार आणि चौकारांची उधळण पाहायला मिळाली आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ गडी गमावून ४०५ धावा केल्या आहेत. ही वेस्ट इंडिजची एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांनी प्रथमच ४०० धावांचा टप्पा ओलांडला. संघाने तीन शतके नोंदवली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर ४०६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु जॉन कॅम्पबेल, शाई होप आणि अमीर जांगू यांच्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने ५० षटकांत सात गडी गमावून ४०५ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जांगूने सर्वाधिक ११४ धावा केल्या आणि तो बाद झाला. कॅम्पबेलने कर्णधार शाई होपसोबत दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. त्यानंतर जांगू आणि होप यांनी तिसऱ्या विकेटसाठी १८२ धावा जोडून वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली.
या तिघांव्यतिरिक्त रॉस्टन चेसने नाबाद २९ धावा करून वेस्ट इंडिजला ४०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. होपने १०४ आणि कॅम्पबेलने १०२ धावा केल्या. केसी कार्टीने ९, अल्झारी जोसेफने ८ आणि कीमो पॉलने ३ धावा केल्या. शमर जोसेफ १४ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून गुरनूर ब्रार, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर प्रसिद्ध कृष्णाने एक बळी मिळवला आहे.
भारतासाठी हे खूप मोठे आव्हान आहे. कारण या फॉरमॅटमध्ये भारताची सर्वोच्च यशस्वी धावसंख्या ३६० धावांची आहे. यामुळे आता भारतावर एकदिवसीय सामन्यांमधील सर्वात मोठ्या यशस्वी धावसंख्येचा पाठलाग पूर्ण करण्याचा दबाव असेल. या फॉरमॅटमध्ये भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६० धावांचा केला होता. त्या सामन्यात रोहित शर्माने नाबाद १४१ आणि विराट कोहलीने नाबाद १०० धावा केल्या होत्या. भारताने अवघ्या ४३.३ षटकांत विजय मिळवला होता. आज भारताला ‘रो-को’कडून चांगल्या कामगिरीची गरज आहे.