
मुंबई इंडियन्सने काल IPL 2024 सीजनमधील पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 29 धावांनी विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 234 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 205 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून रोहित शर्मा (49), इशान किशन (42), कॅप्टन हार्दिक पांड्या (39), टिम डेविड (45) आणि रोमारिओ शेपहर्ड (39) यांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सची टीम 230 पार पोहचू शकली. पराभवाची हॅट्ट्रिक करणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर विजयाच खात उघडलं आहे. मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी केली असली, तरी टीमच्या चाहत्यांना एक प्रश्न पडला आहे. हार्दिक पांड्याला काही दुखापत झालीय का?. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याने दिल्ली कॅपिटल्स विरोधात गोलंदाजी केली नाही. त्यामुळे हार्दिकला दुखापत झालीय का? हा प्रश्न काहींनी उपस्थित केलाय.
हार्दिक पांड्याने एक षटक सुद्धा टाकलं नाही. त्यामुळे सर्वकाही व्यवस्थित आहे ना, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मागच्या वर्षी वनडे वर्ल्ड कप 2023 दरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. काही महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. थेट आयपीएल 2024 मध्ये त्याने कमबॅक केलं आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर हार्दिक पांड्याने गोलंदाजी का केली नाही? त्याचा खुलासा केला. दुखापतीबद्दलही त्याने स्पष्टीकरण दिलं.
हार्दिक पांड्या काय म्हणाला?
“मी व्यवस्थित आहे. मी योग्यवेळी गोलंदाजी करीन. आज सगळं व्यवस्थित झालं. त्यामुळे मी गोलंदाजी केली नाही” असं हार्दिक पांड्या सामन्यानंतर म्हणाला. मुंबई इंडियन्सच्या विजयाचा खरा हिरो रोमारिओ शेपहर्ड ठरला. त्यालाच प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. त्याने शेवटच्या 10 चेंडूत 39 धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सची धावसंख्या 234 पर्यंत पोहोचली. रोमारिओ शेपहर्डने चार सिक्स आणि दोन चौकार मारले.