
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने होते. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानात गुजरात टायटन्सवर 8 विकेट्सने अफलातून विजय मिळवला. वैभव सूर्यवंशी हा 14 वर्षांचा युवा खेळाडू राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. वैभवने 210 धावांचा पाठलाग करताना ऐतिहासिक शतक झळकावलं.
वैभवने 38 चेंडूत 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 101 धावांची भागीदारी केली. वैभवच्या या शतकामुळे राजस्थानचा विजय निश्चित झाला. वैभव आणि यशस्वी या जोडीने 166 धावांची सलामी भागादारी केली. वैभव आऊट झाल्यानंतर नितीश राणा याने 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर यशस्वी आणि कर्णधार रियान पराग या दोघांनी राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं. यशस्वीने 70 आणि रियानने 32 धावांची नाबाद खेळी केली. वैभवने राजस्थानच्या विजयानंतर आणि ऐतिहासिक खेळीनंतर संवाद साधला.
प्रेझेंटटेर मुरली कार्तिक यांनी राजस्थानच्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान वैभवसह संवाद साधला. वैभवने या दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसंच त्याला या खेळीबाबत काय वाटलं? हे देखील वैभवने सांगितलं. “ही खूप चांगली भावना आहे. आयपीएल स्पर्धेतील हे माझं पहिले शतक आहे. ही माझी तिसरी इनिंग होती. स्पर्धेपूर्वी मी खूप सराव केला. त्या सरावाचा निकाल येथे दिसून आला आहे”, असं वैभवने म्हटलं.
तु इतक्या दिग्गज आणि अनुभवी गोलंदाजांसमोर खेळत होतास. त्यांच्यासमोर कसं खेळायचं? त्यांचा सामना कसा करायचा? याचं तुला दडपण नव्हतं का? असा प्रश्न कार्तिकने केला. यावर वैभवने म्हटलं की, “मी फक्त बॉल पाहत होतो आणि खेळत होतो.”
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी विजयी धावांचा पाठलाग करताना 166 धावांची सलामी भागीदारी केली. या जोडीने केलेल्या भागीदारीमुळे राजस्थानचा विजय सोपा झाला. वैभवने शतकी खेळीबाबत बोलताना यशस्वी जयस्वाल याचाही उल्लेख केला. यशस्वी मला दुसऱ्या बाजूने मार्गदर्शन करत होता. मला त्याच्यासोबत बॅटिंग करायला आवडते”, असं म्हणत वैभवने त्याच्या या खेळीचं काही अंशी श्रेय यशस्वीला दिलं आणि मनाचा मोठेपणा दाखवून दिला.