
मुंबई: भारताच्या रोहन बोपन्नाचं (Rohan Bopanna) फ्रेंच ओपन 2022 (French open 2022) स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल होण्याचं स्वप्न भंग पावलं आहे. 42 वर्षीय रोहन बोपन्ना आणि त्याचा डच साथीदार मॅटवी मिडलकूपचा (Matwe middelkoop) सेमी फायनल लढतीत 12 व्या सीडेड जीन-ज्युलियन रॉजर आणि मार्सिलो आरवालो यांनी पराभव केला. बोपन्ना हा सामना जिंकला असता, तर 2013 नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल होणारा पहिला भारतीय ठरला असता. याआधी लिएंडर पेसने अंतिम फेरी गाठली होती. शेवटच्या सेटमध्ये सुपर टाय-ब्रेकरमध्ये बोपन्ना आणि मिडलकूपने दोन मॅच पॉइंट वाचवले. पण रॉजर आणि आरवालोने 4-6,6-3,7-6 (8) असा सेटसह सामना जिंकला. रोहन बोपन्नाने ग्रॅबियला डाबरोविसकीसह 2017 साली फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीच जेतेपद पटकावलं होतं.
रोहन बोपन्ना आणि मडिल कूपची जोडी पहिल्यांदा फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलपर्यंत पोहोचली होती. बोपन्ना-मिडलकूप जोडीने क्वार्टर फायनलमध्ये टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते आणि दुसऱ्या सीडेड निकोला आणि मेट पॅव्हीस जोडीला पराभूत केलं होतें. पाच मॅच पॉइंट वाचवल्यानंतर त्यांनी ही कामगिरी केली होती.
एप्रिल महिन्यात बीलग्रेड येथे बोपन्ना-मिडलकूप जोडी एटीपी 250 स्पर्धेत सहभागी झाली होती. इटालियन ओपनमध्येही दोघे एकत्र खेळले. या सीजनच्या सुरुवातीला माँटी कार्लो मास्टर्स स्पर्धेत बोपन्ना-जॅमी मुर्रेसह उपांत्यफेरीत पोहोचला होता.