
Pathum Nissanka Record : एका दगडात दोन पक्षी मारणं हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. पण आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत, त्याने एकाच मॅचमध्ये 3 मोठे कारनामे केलेत. काल 26 सप्टेंबरला भारत-श्रीलंकेमध्ये आशिया कप 2025 मधील सामना झाला. यात श्रीलंकेचा स्फोटक फलंदाज पाथुम निसंकाने तीन रेकॉर्ड मोडले. आपल्या खेळाने T20 आशिया कपमध्ये विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडणाऱ्या या खेळाडूची बॅकग्राऊंड स्टोरी सुद्धा तितकीच रंजक आहे. हा खेळाडू मैदानातील सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पाथुम निसंकाच बालपण गरीबीत गेलं. घरची परिस्थिती बेताची होती.
पाथुम निसंकाचे वडील पेशाने ग्राऊंड बॉय होते. उत्पन्न फार कमी होतं. घर खर्च भागवण्यासाठी आई मंदिराबाहेर फुल विक्रीचा व्यवसाय करायची. पाथुम निसंकाच बालपण जरुर गरीबीत गेलं. पण त्याने आपल्या क्रिकेटमधील प्रतिभेच्या जोरावर आई-वडिलांना गरीबीतून बाहेर काढलं. आजच्या तारखेला पाथुम निसंका श्रीलंकन क्रिकेटमधील मोठा चेहरा आहे. त्याला श्रीलंकेचा स्टार खेळाडू का म्हटलं जातं, ते त्याने आशिया कप 2025 मध्ये सुपर-4 च्या सामन्यात दाखवून दिलं.
तीन कारनामे काय केले?
पाथुम निसंकाने भारताविरुद्ध 184.48 च्या स्ट्राइक रेटने 58 चेंडूत 107 धावा फटकावल्या. यात 6 सिक्स आणि सात फोर आहेत. या शतकासह त्याने तीन मोठे कारनामे केले. आशिया कप 2025 मध्ये शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानंतर दुसरं, श्रीलंकेचा तो असा चौथा फलंदाज आहे, ज्याच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक झळकवण्याच्या रेकॉर्डची नोंद झाली. आशिया कप 2025 मध्ये तो पहिला असा खेळाडू ठरला, ज्याची टीम हरल्यानंतरही त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
विराट कोहलीचा कुठला रेकॉर्ड मोडला?
श्रीलंकेच्या या डावखुऱ्या फलंदाजाने जे 3 कारनामे केले, त्यात पहिलं म्हणजे T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक धावांचा विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला. T20 आशिया कपमध्ये विराट कोहलीच्या नावावर 429 धावा होत्या. त्याने 10 मॅच 9 इनिंगमध्ये 1 शतक आणि 3 हाफ सेंच्युरी बनवलेल्य़ा. पाथुम निसंकाच्या नावावर आता आशिया कप T20 मध्ये 434 धावा झाल्या आहेत. त्याने एक शतक, 4 हाफ सेंच्युरीसह 12 सामन्यात 12 इनिंगमध्ये हा रेकॉर्ड केलाय.
पाथुम निसंका T20 आशिया कपमध्ये शतक झळकवणारा तिसरा फलंदाज बनलाय. या लिस्टमध्ये भारताच्या विराट कोहली आणि हॉन्ग कॉन्गच्या बाबर हयातच नाव आहे.