India vs Australia 1st T20 : रवींद्र जडेजाची फटकेबाजी, चहलची फिरकी आणि थंगारासूचा दणका, टीम इंडियाच्या विजयाचे हिरो

| Updated on: Dec 04, 2020 | 6:50 PM

टीम इंडियाने या विजयासह 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Australia 1st T20 : रवींद्र जडेजाची फटकेबाजी, चहलची फिरकी आणि थंगारासूचा दणका, टीम इंडियाच्या विजयाचे हिरो
Follow us on

कॅनबेरा : टीम इंडियाने (Team India Tour Australia 2020-21) पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), थंगारासू नटराजन (Thangarasu Natrajan) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ही तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. India vs Australia 1st T20 Ravindra Jadeja, Yujvendra Chahal and Thangara became the heroes of the first T20 match

रवींद्र जडेजाची फटकेबाजी

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. त्यामुळे भारताच्या 150 धावाही होतील की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाज बाद झाले. यानंतर जडेजाने टीम इंडियाचा डाव सावरला. जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने तडाखेदार नाबाद 44 धावा केल्या. जडेजाच्या या निर्णायक खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजायासाठी 162 धावांचं सन्मानजनक आव्हान देता आलं.

जडेजाला दुखापत चहलला संधी

पहिल्या डावातील शेवटची ओव्हर मिचेल स्टार्क टाकत होता. स्टार्कने टाकलेला चेंडू जडेजाच्या हेल्मेटवर येऊन आदळला. सुदैवाने यात जडेजाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र त्याला मैदानाबाहेर जावे लागले. तसेच जडेजाला सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी येता आले नाही. त्यामुळे जडेजाऐवजी युजवेंद्र चहलला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली.

ज्याला वगळलं त्यानेच जिंकवलं

युजवेंद्र चहलला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नव्हती. मात्र जडेजा दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागी या सामन्यात चहलला बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली. चहलने या संधीचं सोनं केलं. चहलने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 6.20 च्या इकॉनॉमी रेटने 25 धावा देत 3 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. या 3 विकेट्समध्ये कर्णधार अॅरॉन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड या तिघांचा समावेश होता.

थंगारासूचे दमदार पदार्पण

थंगारासून नटराजनने एकदिवसीय सामन्यानंतर टी 20 मध्ये पदार्पण केलं. या पदार्पणातील सामन्यात थंगारासूने चमकदार कामगिरी केली. थंगारासूने 4 ओव्हरमध्ये 30 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

टी 20 मधील सलग 9 वा विजय

ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाचा हा सलग 9 नववा विजय ठरला. टीम इंडियाने 2019 पासून आतापर्यंत एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. या मालिकेतील दुसरा टी 20 साामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी हा दुसरा सामना करो या मरोचा असणार आहे. यामुळे दुसऱ्या टी 20 सामन्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळू शकते.

संबंधित बातम्या :

Thangarasu Natarajan | चाळीत टेनिस बोलने यॉर्करचा सराव, ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 पदार्पण, थंगारासू नटराजनची संघर्षकथा

India vs Australia 1st T20 Ravindra Jadeja, Yujvendra Chahal and Thangara became the heroes of the first T20 match