मुलांनो खेळापासून दूर राहा, सुपर ओव्हर खेळलेला न्यूझीलंडचा फलंदाज भावूक

| Updated on: Jul 15, 2019 | 10:49 PM

न्यूझीलंडच्या खेळाडूंनाही अश्रू आवरता आले नाही. न्यूझीलंडसाठी सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे फक्त चौकार-षटकारांच्या नियमामुळे सामना गमवावा लागला. शिवाय ओव्हर थ्रोला दिलेल्या धावांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.

मुलांनो खेळापासून दूर राहा, सुपर ओव्हर खेळलेला न्यूझीलंडचा फलंदाज भावूक
Follow us on

लंडन : लॉर्ड्सवर झालेल्या विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला बरोबरीची टक्कर दिली. पण कठोर मेहनतीनंतरही न्यूझीलंडला विजेता होण्यापासून दूर रहावं लागलं. सुपर ओव्हरमध्ये समान धावा केल्यानंतरही आयसीसीच्या नियमानुसार इंग्लंडचा विजय झाला. यामुळे खेळाडूंचाही हिरमोड झालाय. न्यूझीलंडच्या खेळाडूंनाही अश्रू आवरता आले नाही. न्यूझीलंडसाठी सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे फक्त चौकार-षटकारांच्या नियमामुळे सामना गमवावा लागला. शिवाय ओव्हर थ्रोला दिलेल्या धावांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.

सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आलेला जेम्स नीशामने ट्वीट करुन त्याची प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या दहा वर्षात किमान एक किंवा दोन दिवस तरी असेल येतील, जेव्हा मी गेल्या अर्ध्या तासात जे घडलं त्याबाबत विचार करु शकणार नाही, असं ट्वीट करत त्याने इंग्लंडला विजयाच्या शुभेच्छाही दिल्या.

नीशामने आणखी एक ट्वीट करत मुलांना आवाहन केलंय. मुलांनो खेळाला कधीही निवडू नका. स्वयंपाक करायला शिका किंवा काही काम करा. 60 वर्षे वयातही खुश राहून जगाचा निरोप घ्या, असं ट्वीट त्याने केलंय. आयसीसीचे नियम आणि छोट्या चुकांमुळे झालेल्या पराभवामुळे नीशामच्या भावना अनावर झाल्याचं या ट्वीटमधून दिसून येतं.

अष्टपैलू जेम्स नीशामने संपूर्ण विश्वचषकात दमदार कामगिरी केली. फायनल सामन्यातही त्याने 25 चेंडूत त्याने 19 धावांचं योगदान दिल आणि नंतर महत्त्वाच्या तीन विकेट्सही घेतल्या. शिवाय अखेरच्या सुपर ओव्हरमध्ये 5 चेंडूत 13 धावा केल्या आणि न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या. पण शेवटच्या चेंडूवर दोन धावा न काढता आल्यामुळे इंग्लंडने सामना जिंकला.