ऑरेंज आर्मी! हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय पुरूष संघाची विजयी सलामी, वेल्सला 3-1 गोलने नमवलं
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा पहिला सामना वेल्सशी झाला. या सामन्यात भारताने अनुभवाच्या जोरावर वेल्सला नमवलं आणि स्पर्धेत विजयी सुरूवात केली.

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाचा सामना वेल्सविरुद्ध झाला. भारताने वेल्सला 3-1 ने नमवून विजयी सलामी दिली. या सामन्यात भारताने पहिल्या हाफपासून पकड मिळवली होती. खरं तर भारताची सुरूवात संथ झाली. पण त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ दाखवला. पहिल्या हाफमधील पहिल्या 15 मिनिटांच्या क्वॉर्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. भारताला पहिली आघाडी आठव्या मिनिटाला संजयने मिळवून दिली.पेनल्टी कॉर्नरवर युवा डिफेंडर संजयने अप्रतिम ड्रॅग-फ्लिकचा वापर केला आणि वेल्सच्या खेळाडूंना चकवलं. वेल्सच्या डिफेन्सला भेदून त्याने चेंडू थेट नेटच्या कोपऱ्यात भिरकावला आणि भारताने या गोलसह आघाडी घेतली. दुसरा गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने मिळवून दिला. 11 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा पुरेपूर फायदा उचलला आणि ताकदीचा वापर करून अचूक फ्लिक मारला. त्याचा हा मारा वेल्सचा गोलकीपर रोखू शकला नाही. 16 ते 30 मिनिटांच्या दुसरा क्वॉर्टर गोलरहित झाला. वेल्सने यावेळी मजबूत डिफेंस केला. सूरज करकेरा आणि मोहित यांचा गोल मारण्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये दोन क्वॉर्टरनंतर भारताची 2-0 ने आघाडी राहिली.
दुसऱ्या हाफमध्ये काय झालं?
भारत आणि वेल्स सामन्याच्या तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने आक्रमक खेळ दाखवला. 31 ते 45 मिनिटांच्या खेळात भारताने आणखी एक गोल मारला आणि 3-0 ने आघाडी घेतली. मिडफिल्डमधून मिळालेल्या उत्तम पासेसचा फायदा घेत भारताच्या सुमितने अप्रतिम मैदानी गोल केला. मागे पडलेल्या वेल्स संघाने या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आलं. सामन्यात ३ गोलने मागे पडल्यानंतर वेल्सच्या संघाने सामन्याच्या शेवटच्या 15 मिनिटात एक गोल मारत 3-1 अशी स्थिती आणली. पण बरोबरी किंवा विजय काही साध्य करता आला नाही.
भारतीय हॉकी संघ
- गोलकीपर: मोहीत एच.एस., सूरज करकेरा
- डिफेंडर्स: हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, यशदीप सिवाच.
- मिडफील्डर्स: मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलकांत शर्मा, राजिंदर सिंग, आदित्य अर्जुन लालगे.
- फॉरवर्ड्स (आक्रमक): मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा