
टीम इंडियाने आशिया कप 2025 मध्ये सुपर 4 फेरीत रविवारी 21 सप्टेंबरला 6 विकेट्सने मात करत फायनलच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. काल भारत आणि पाकिस्तान सामना जोरदार रंगला. यावेळी काही धक्कादायक गोष्टी घडल्या, याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. हेच नाही तर भारतीय प्रेक्षकांकडून आता पाकिस्तान संंघावर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. त्याचे झाले असे की, पाकिस्तान संघाचा खेळाडू साहिबझादा फरहान याने टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानसाठी सर्वाधिक 58 धावा केल्या. मात्र, आपले अर्धशतक झाल्यानंतर त्याने जे काही कृत्य केलं त्यानं जग हादरल्याचे बघायला मिळाले. साहिबझादाने अर्धशतकानंतर बॅट बंदूकीप्रमाणे हातात धरली आणि थेट फायरिंग करण्याची एक्शन केली. त्याच्या या धक्कादायक कृत्यानंतर संपूर्ण पाकिस्तान संघावर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नये, अशी जवळपास सर्व भारतीयांची इच्छा होती. हेच नाही तर आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याला भारतातून विरोध होताना दिसला. पहलगाम हल्ल्यामध्ये अनेक भारतीयांचे जीव गेले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरू असल्याचे लष्कराने स्पष्ट केले. मात्र, तरीही भारतीय संघ पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो. त्यामध्येच पाकिस्तानच्या खेळाडूने थेट फायरिंगची एक्शन केल्याने वाद अधिकच वाढला आहे.
खासदार संजय राऊत यांनी या प्रकारानंतर आपला संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी फोटो शेअर करत एक्सवर पोस्ट लिहित म्हटले की,आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडले…सोहबजादा फरहान याचे अर्धशतक लागताच त्याने मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची एक्शन केली,पाकड्यानी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता.
आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडले
सोहबजादा फरहान याचे अर्ध शतक लागताच त्याने मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची एक्शन केली,
पाकड्यानी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता
बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे.
भारताचे… pic.twitter.com/AgByPlaWwu— Sanjay Raut (@rautsanjay61) September 21, 2025
पुढे राऊतांनी म्हटले की, बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचे लष्कर आणि पुलवामा पहलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे, अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. यामुळे आता हा वाद वाढण्याचे स्पष्ट संकेत आहेत. आता भारतीय क्रिकेट बोर्ड नेमका काय निर्णय घेतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत.