ENG vs IND : लीड्स टेस्ट दरम्यान केएल राहुल आणि ऋषभ पंतवर मोठा आरोप

ENG vs IND : लीड्स कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. इंग्लंडला विजयासाठी 350 धावांची गरज आहे. या दरम्यान टीम इंडियाचे शतकवीर केएल राहुल, ऋषभ पंत यांच्यावर मोठा आरोप झाला आहे. अंपायरनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं म्हटलं जात आहे.

ENG vs IND : लीड्स टेस्ट दरम्यान केएल राहुल आणि ऋषभ पंतवर मोठा आरोप
KL Rahu-Rishabh Pant
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 24, 2025 | 2:56 PM

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या एका कृतीवर खूप निराश आहे. सध्या इंग्लंड आणि भारतामध्ये लीड्स येथे पहिला कसोटी सामना सुरु आहे. यात दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाकडून शानदार शतक झळकावलं. केएल राहुलने 137 तर ऋषभ पंतने 118 धावांचं योगदान दिलं. स्टुअर्ट ब्रॉडच म्हणणं आहे की, दोन्ही खेळाडू या टेस्टमध्ये प्रत्येक चेंडू खेळल्यानंतर दुसरा चेंडू खेळण्यासाठी बराच वेळ घेत होते. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना बॉलिंग करताना त्रास होत होता.

स्टुअर्ट ब्रॉड कॉमेंट्री बॉक्समध्ये होता. तो म्हणाला की, “इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना राग येत असेल. कारण दोन्ही खेळाडू प्रत्येक चेंडूनंतर दुसरा चेंडू खेळण्यासाठी वेळ घेत आहेत. फलंदाजांनी जास्त वेळ घेऊ नये, याची अंपायरला तुम्हाला आठवण करुन द्यावी लागेल. मी स्वत: फलंदाजांना सांगायचो, मी गोलंदाजीच्या रनअपसाठी जातोय, तो पर्यंत तुम्ही तयार व्हा. राहुल फिल्डकडे पाहत होता आणि कार्सला 10 सेकंद आणखी लागायचे. मला वाटतं अंपायर्सनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी”

तुम्हाला खेळाचा कंट्रोल रोखायचा आहे

ब्रॉडसोबत कॉमेंट्री करणारा मेल जोन्स म्हणाला की, “ही योग्य गोष्ट नाहीय. आम्ही क्रिकेट पाहत मोठे झालोय. गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी तयार असताना तुम्ही तयार असलं पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला खेळाचा कंट्रोल रोखायचा आहे. हा भारतीय टीमच्या खेळाचाच भाग असेल”

आज इंग्लंडला विजयासाठी 350 धावांची गरज

टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 471 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. टीम इंडियाने दुसऱ्याडावात 364 धावा केल्या. भारतीय टीमकडून या दोघांशिवाय करुण नायरने 20 धावा केल्या. साई सुदर्शनने 30 धावांच योगदान दिलं. रवींद्र जाडेजाने 25 धावा केल्या. यजमान इंग्लंडकडून दुसऱ्याडावात जोश टंग आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी तीन-तीन विकेट काढले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 21 धावा केल्या होता. त्यांना विजयासाठी अजून 350 धावांची आवश्यकता आहे. पाचव्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा असेल.