Sunil Gavaskar : ‘120 पैकी जर तुम्ही 80 ते 85 चेंडूंवर..’ संजू सॅमसनच्या यशाचं कौतुक करताना सुनील गावस्कर एकदम नेमकं बोलले

Sunil Gavaskar : संजू सॅमसन काल टीम इंडियाचा हिरो ठरला. त्याच्या नाबाद 97 धावांच्या मॅच विनिंग खेळीमुळे भारतीय क्रिकेट संघ टी20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्यफेरीत पोहोचला. सुनील गावस्कर यांनी संजू सॅमसनच्या खेळाचं कौतुक करताना टीम इंडियाच्या रणनीतीचं अचूक विश्लेषण केलय.

Sunil Gavaskar : 120 पैकी जर तुम्ही 80 ते 85 चेंडूंवर.. संजू सॅमसनच्या यशाचं कौतुक करताना सुनील गावस्कर एकदम नेमकं बोलले
sunil Gavaskar
| Updated on: Mar 02, 2026 | 5:23 PM

वेस्ट इंडिज विरुद्धच्या करो या मरो सामन्यात अखेर संजू सॅमसनची बॅट तळपली. बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट चाहते संजू सॅमसनकडून अशा इनिंगची अपेक्षा करत होते. संजूला वारंवार संधी मिळूनही तो अपयशी ठरत होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलं. मात्र, अखेर एका महत्वाच्या सामन्यात संजूला सूर गवसला. संजूने जी बॅटिंग केली, त्याला तोड नाही. शतकासाठी भले त्याला तीन धावा कमी पडल्या. पण त्याच्या खेळीचं मोल शतकापेक्षाही जास्त आहे. सुपर-8 राऊंड जरी असला, तरी ती क्वार्टर फायनलची मॅच बनली होती. कारण हरलो असतो तर भारताचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं असतं. पण संजूने या महत्वाच्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करुन टीकाकारांची तोंड बंद केली.

“संजू ज्या यशासाठी पात्र आहे, ते त्याला अखेर मिळालं ही फक्त मॅच विनिंग इनिंग नाहीय. एका कठीण काळानंतरचा एक चांगला भावनिक क्षण आहे” असं महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले. “संजूने अनेक चढ-उतार पाहिलेत. तो इतका चांगला मुलगा आहे की, आपल्यालाही ते जाणवलं. प्रत्येकाला वाटतं होतं की, त्याने चांगलं खेळावं” असं गावस्कर म्हणाले. “या प्रामाणिक क्रिकेटपटूला जे यश मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं म्हणून भारतीय क्रिकेट चाहते आनंदात आहेत” असं गावस्कर यांना वाटतं. धावांचा पाठलाग करताना संजू कसा विचार करत होता, त्या बद्दल गावस्कर बोलले. निर्धाव चेंडू कसे कमी जातील यासाठी संजू प्रयत्न करत होता असं गावस्कर म्हणाले.

तिथेच अर्धी लढाई जिंकलेली

“सेट झालेला फलंदाज क्रीजवर असणं फायद्याचं असतं. दुसरा फलंदाज एकेरी धावा पळून सेट फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक देतो. यामध्ये जास्त निर्धाव चेंडू जात नाहीत. टी20 क्रिकेटमध्ये कमीत कमी निर्धाव चेंडू असले पाहिजेत” असं गावस्कर म्हणाले. “निर्धाव चेंडूंची संख्या कमी असली पाहिजे हे टीम इंडियान समजून घेतलं. कमी चेंडू निर्धाव खेळण्यामध्ये भारत एका चांगल्या स्थानावर आहे. ते सर्वोत्तम आहेत असं मी म्हणणार नाही. पण ते वर आहेत. तिथेच अर्धी लढाई जिंकलेली” असं सुनील गावस्कर म्हणाले. “120 पैकी जर तुम्ही 80 ते 85 चेंडूंवर धावा काढल्या तर तुम्ही 190 ते 200 धावा चेज करु शकतात. भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध नेमकं तेच केलं” अस गावस्कर म्हणाले.

Follow Us