प्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची सुट्टी, माजी सलामीवीराला संधी

| Updated on: Aug 22, 2019 | 10:13 PM

एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्त्वातील समितीने या पदांसाठी प्रत्येकी तीन-तीन नावांची शिफारस केली होती आणि सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रशिक्षकाचं (Sanjay Bangar) नाव वरच्या स्थानावर होतं, त्याची निवड करण्यात आली.

प्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची सुट्टी, माजी सलामीवीराला संधी
Follow us on

नवी दिल्ली : माजी सलामीवीर फलंदाज विक्रम राठोड हे भारतीय क्रिकेट संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक असतील. ते संजय बांगर (Sanjay Bangar) यांची जागा घेतील, तर भरत अरुण आणि आर श्रीधर अनुक्रमे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्त्वातील समितीने या पदांसाठी प्रत्येकी तीन-तीन नावांची शिफारस केली होती आणि सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रशिक्षकाचं (Sanjay Bangar) नाव वरच्या स्थानावर होतं, त्याची निवड करण्यात आली.

कोण आहेत विक्रम राठोड?

50 वर्षीय विक्रम राठोड यांनी भारताकडून 1996 मध्ये 6 कसोटी सामने आणि 7 वन डे सामने खेळले. यामध्ये त्यांना खास कामगिरी करता आली नाही. रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी पंजाबकडून चांगली कामगिरी केली होती. ते काही वर्षांपूर्वी म्हणजे 2016 पर्यंत संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वातील बीसीसीआयच्या निवड समितीचे सदस्यही होते. यापूर्वी राठोड यांनी एनसीए फलंदाजी सहाय्यक आणि अंडर 19 फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता, पण तो अर्ज राखून ठेवण्यात आला. कारण, त्यांचे नातेवाईक आशिष कपूर अंडर-19 निवडसमितीचे अध्यक्ष आहेत.

विक्रम राठोड यांची निवड कशामुळे?

विक्रम राठोड यांच्याकडे पुरेसा अनुभव असून बीसीसीआयला त्यांच्या कौशल्यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी दिली. निवडसमितीच्या शिफारशीनुसार संजय बांगर दुसऱ्या आणि इंग्लंडचे माजी फलंदाज मार्क रामप्रकाश तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

भारतीय संघ व्यवस्थापनाचं स्वतःचं एक मत होतं. पण आम्हाला नव्या सहाय्यक स्टाफची आणि नव्या चेहऱ्यांची आवश्यकता वाटली, असंही जोहरी यांनी सांगितलं. मुंबई इंडियन्सचे माजी फिजिओ नितीन पटेल यांना पुन्हा एकदा भारतीय संघाचे फिजिओ म्हणून नियुक्त करण्यात आलंय. ते यापूर्वी 2011 मध्ये या पदावर होते. इंग्लंडचे ल्यूक वुडलहाऊस यांना अनुकूलन प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

विद्यमान प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांची सुट्टी निश्चित आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन त्यांना महागात पडलं. सुब्रमण्यम यांच्या जागी गिरीश डोंगरी यांना हे पद देण्यात आलंय.

प्रत्येकात विभागात तीन नावं निवडली

फलंदाजी प्रशिक्षक

  • विक्रम राठोड
  • संजय बांगर
  • मार्क रामप्रकाश

गोलंदाजी प्रशिक्षक

  • भारत अरुण
  • पारस
  • व्यंकटेश प्रसाद

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक

  • आर. श्रीधर
  • अभय शर्मा
  • टी. दिलीप

फिजियो

  • नितीन पटेल
  • अँड्र्यू लिपस
  • वैभव डागा

प्रशासकीय व्यवस्थापक

  • गिरीश डोंगरे
  • व्यंकटेश राजगोपालन
  • आनंद याल्वीगी