
तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर आता तुमच्या खिशावर मोठा फटका बसणार आहे, कारण भारतात फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. भारतातील अनेक स्मार्टफोन कंपन्यानी त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती 2000 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मेमरी आणि चिप्स सारख्या स्टोरेज कंपोनंट्सच्या किमतीत सतत वाढ झाल्यामुळे फोन महाग झाले आहेत. त्यामुळे याचा परिणाम आता या वर्षी लाँच होणाऱ्या फोनच्या किमतींमध्ये दिसून येईल. तर आजच्या लेखात आपण कोणत्या कंपनीने किमतीत किती वाढ केली आहे ते जाणून घेऊयात.
या कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या किमती वाढल्या
कंपोनंट्सच्या किमतीत वाढ झाल्याने याचा परिणाम आता मोबाईल खरेदी करणाऱ्यांवर होणार आहे. द हिंदूमधील एका वृत्तानुसार, Vivo T Series आणि Vivo T4x 5G सिरीजच्या स्मार्टफोनच्या किमतीत 1,500 रूपयांची वाढ झाली आहे. तर Oppo Reno 14 सिरीज आणि Oppo F31 सिरीज असलेल्या स्मार्टफोन किमतीतही 1,000 ते 2,000 रूपयापर्यंत वाढ झाली आहे.
Samsung A17 या स्मार्टफोनच्या किमतीत 500रुपयांची वाढ केली आहे. त्यात सॅमसंग कंपनी त्यांचा फोन खरेदीवर चार्जर देत नाही, त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त 1,300 रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ सॅमसंग फोन खरेदीदारांना आता अंदाजे 1,800 रुपये जास्त द्यावे लागतील. एआयएमआरए (ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन) ने जागतिक स्टोरेज कंपोनंट्सच्या वाढत्या किमती हे प्रमुख कारण असल्याचे सांगून किमतीत सतत वाढ होत राहण्याचा इशारा दिला आहे.
2026 च्या अखेरीपर्यंत किमती वाढतच राहतील
OEMs ने शेअर केलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2025 पासून मेमरी आणि चिप कंपोनंट्सच्या किमती वाढत आहेत आणि मेमरी पुरवठ्यातील कमतरतेमुळे ही समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. उद्योग संशोधनानुसार 2026 च्या अखेरपर्यंत मेमरी, चिप आणि कच्च्या मालाच्या किमती वाढत राहण्याची अपेक्षा आहे.
एआयमुळे स्टोरेज कंपोनंट्सच्या मागणी वाढत आहे
मशीन लर्निंग सिस्टीम आणि डेटा सेंटर्सना पॉवर देण्यासाठी एआय उच्च दर्जाच्या मेमरीची मागणी वाढवत आहे. एकेकाळी फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्स आता जनरेटिव्ह एआयला पॉवर देण्यासाठी वाढत्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. त्यामुळे याचा परिणाम आता मोबाईल खरेदी करणाऱ्यांवर होणार आहे. वाढत्या मोबाईलच्या किंमती लक्षात घेता आता ग्राहकांनाही त्यांचा बजेट वाढवावा लागणार आहे.