
नवरा बायकोचं नातं हे अत्यंत जिव्हाळ्याचं नातं मानलं जातं. दोघंही सुख दु:ख वाटून घेऊन संसाराचा गाडा पुढे हाकत असतात. एकमेकांच्या अडीअडचणींना समजून घेऊन पुढे जात असतात. यात माझं तुझं असं काही नसतं. इतकं अतुट नातं लग्नाने तयार होतं. पण उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये मात्र एका नात्यातील मोठा वाद समोर आला आहे. नवऱ्याने फक्त बायकोच्या अंघोळीचा साबूण वापरला म्हणून बायकोनं इतकं आकांडतांडव केलं की नवऱ्याला नको नकोसं झालं. एवढंच काय, तर तिने थेट पोलिसांनाच घरी बोलावल्याने नवऱ्याची चांगलीच तंतरली.
उत्तर प्रदेशातली अलिगडच्या रावण टीला परिसरातील संजय गांधी कॉलनीत ही घटना घडली. साबणावरून वाद झाल्याने बायकोने घरी पोलिसांना बोलावलं. तर या व्यक्तीने पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे. पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. तरुणावर शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
संजय गांधी कॉलनीत राहणाऱ्या प्रवीणचं लग्न 13 वर्षापूर्वी झालं आहे. प्रवीण हा बायको आणि आई पुष्पा हिच्यासोबत एकत्र राहतो. प्रवीणच्या आईने त्याच्या बायकोवर गंभीर आरोप केले आहेत. प्रवीणची बायको त्याच्याशी नेहमी झगडा करत असते. शुक्रवारी सकाळी प्रवीण आंघोळ करत होता. त्यावरून सुनेने वाद घालायला सुरुवात केली. माझ्या साबणाने तू का आंघोळ करत आहेस? असा सवाल तिने प्रवीणला केला. त्यावरून वाद सुरू झाला. माझी सून इतकी संतापली की तिने प्रवीणला विट फेकून मारली. त्यानंतर प्रवीणनेही तिला मारहाण केली, असं पुष्पाचं म्हणणं आहे. हे भांडण सुरू असताना सूनेच्या आईवडिलांनी पोलिसांना बोलावलं. त्यानंतर पोलीस घरी आले आणि ते प्रवीणला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ लागले, असंही तिने सांगितलं.
पोलिसांनी मारलं
दरम्यान, पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप प्रवीणने केला आहे. मी तुमच्यासोबत येत आहे. पळून जात नाही, एवढंच मी पोलिसांना म्हणालो. असं म्हटल्यावर पोलिसांनी माझ्या कानशिलात लगावली. त्यामुळे मी पोलिसांना शिवीगाळ केली, असं प्रवीणने म्हटलंय. मी शिवीगाळ केल्याने पोलिसांनी त्याचा राग धरला आणि पोलीस ठाण्यात नेऊन मला लाठीने मारहाण केली. या मारहाणीत माझ्या बोटाला दुखापत झाली आहे, असं प्रवीणने सांगितलं.
मारहाण केली नाही
मात्र, पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. प्रवीणने शिवीगाळ केली, असं पोलिसांनी म्हटलंय. सीओ तृतीय सर्वम सिंह यांच्या सांगण्यानुसार, प्रवीणच्या बायकोने तक्रार दिली होती. नवऱ्याने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप त्याच्या बायकोने केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात शांतता भंग केल्याची कारवाई केली आहे. नवरा बायकोचं मेडिकल केलं आहे. पोलिसांनी प्रवीणला मारहाण केली नाही. आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत.