गावात फिरताना संशय आला, जमीन खोदताच सापडला 2000 वर्ष जुना खजिना; एका रात्रीत पालटलं नशीब
जर्मनीमध्ये मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने एका व्यक्तीला 2000 वर्षांपूर्वीचा भव्य रोमन खजिना सापडला. यामध्ये 934 चांदीची नाणी असून त्यांचे वजन 3.1 किलो आहे. पुरातत्त्व विभागालाही या शोधामुळे धक्का बसला. हा खजिना सम्राट हॅड्रियनच्या काळातील असून, जमिनीखाली लपवण्याचे कारण अद्याप गूढ आहे. ही ऐतिहासिक संपत्ती त्या काळातील आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकते.

तुम्ही गावातून फिरत आहात. मेटल डिटेक्टर जमिनीवर ठेवलं आणि जमिनीखाली काही तरी असल्याचे संकेत मिळाले. तर तुम्ही माती हटवण्यास सुरुवात करता. त्यानंतर बराच वेळ खोदल्यानंतर तुम्हाला अचानक सोने आणि चांदीची नाणी सापडू लागतात. त्यामुळे तुम्ही काही काळ हवेतच तरंगणार. एका व्यक्तीच्याबाबत असंच काही तरी घडलंय. त्याला जमिनीच्या खाली सुमारे 2000 वर्ष जुना रोमन खजिना सापडला. हा खजिना पाहून पुरातत्त्व विभागाचे अधिकारीही हैराण झाले आहेत.
पश्चिम जर्मनीच्या कोलोन येथील दक्षिण वेसलिंगजवळ ओलिव्हर रीडल मेटल डिटेक्टर घेऊन भूर्गभात काय दडलंय याचा शोध घेत होता. तो नेहमी हेच करायचा. त्यामुळे त्याच्यासाठी ही गोष्ट नवीन नव्हती. त्या दिवशीही तो असाच जमिनीत काय दडलंय हे शोधत होता. त्यावेळी त्याला वारंवार काही संकेत मिळत होते. जमिनीखाली काही तरी असल्याचे हे संकेत होते. एखादा जुना धातू असू शकतो असं त्याला सुरुवातीला वाटलं. पण डिटेक्टर वारंवार सिग्नल देऊ लागल्याने त्याला जमिनीखाली काही तरी मोठा खजिना असल्याचं कळून चुकलं.
जमिनीखाली चांदीची नाणी
रीडल यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून उत्खनन सुरू केले. त्यानंतर समोर आलेल्या गोष्टीने सर्वांनाच चकित केले. उत्खननात रोमन काळातील ९३४ चांदीचे डेनारी सापडले. या नाण्यांचे एकूण वजन सुमारे ६.८ पाउंड, म्हणजेच अंदाजे ३.१ किलोग्रॅम होते. हा खजिना सुमारे २,००० वर्षे जुना असल्याचे मानले जात आहे. राईनलँडमधील पुरातत्त्वीय स्मारकांच्या संरक्षण कार्यालयाच्या माहितीनुसार, सम्राट हॅड्रियनच्या कारकीर्दीशी संबंधित हा जर्मनीत आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा नाण्यांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे.
कुणी लपवली नाणी?
एवढी सर्व नाणी एकत्रितपणे जमिनीत का पुरण्यात आली? याचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. तज्ज्ञांच्या मते, ही नाणी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या दुसऱ्या तिमाहीत जाणीवपूर्वक जमिनीत लपवण्यात आली होती. राज्याचे पुरातत्त्वज्ञ आणि संबंधित कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, यामागील खरे कारण केवळ अंदाजानेच सांगता येऊ शकते. तरीही, त्या काळी एखाद्या व्यक्तीने आपली जमापुंजी सुरक्षित ठेवण्यासाठी ती जमिनीत लपवली असावी, ही शक्यता सर्वाधिक आहे. मात्र, त्यानंतर ती व्यक्ती परत का आली नाही, हा प्रश्न आजही गूढ राहिला आहे. काही कारणाने तिला आपला खजिना घेण्यासाठी येता आले नाही आणि पाहता पाहता ही संपत्ती शतकानुशतके जमिनीखाली दडून राहिली.
अनेक वर्षांच्या कमाईइतका खजिना
या नाण्यांवरून केवळ त्या काळातील संपत्तीचा अंदाज येत नाही, तर इतकी मोठी रक्कम त्या वेळी किती महत्त्वाची असेल हेही कळते. पुरातत्त्व कार्यालयाच्या माहितीनुसार, एका रोमन सैनिकाला वर्षाला सुमारे ३०० दिनार मिळत असत. मात्र, त्याच्या कमाईचा काही भाग अन्न आणि आवश्यक सामानावर खर्च होत असे. संशोधकांच्या अंदाजानुसार, वेसलिंग येथे सापडलेल्या खजिन्याइतकी रक्कम साठवण्यासाठी एका सैनिकाला आपले खर्च करण्यायोग्य संपूर्ण उत्पन्न सुमारे सहा वर्षे वाचवावे लागले असते.
