
चीन : 23 जानेवारी 2024 | शिक्षणानंतर आपली मुलं स्वत:च्या पायावर उभी राहावीत, चांगल्या पगाराची नोकरी किंवा व्यवसाय करावा असं स्वप्न प्रत्येक पालकाचं असतं. पण जर एखाद्या आईनेच मुलीला पैसे देऊन नोकरी सोडायला लावलं तर? होय चीनमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेनं तिच्या मुलीला हजारो येन (चीनमधील चलन) देऊन नोकरी सोडण्याचा आग्रह केला. त्यामागचं कारणंही तसंच होतं. 20 वर्षीय जोउ ही चीनमधील चोंगकिंगमध्ये काम करते. काही दिवसांपूर्वी तिची आई तिला भेटायला आली होती. मात्र नोकरीमुळे झालेली मुलीची अवस्था पाहून त्यांना तिची चिंता वाटू लागली होती. मुलीची तणावपूर्ण जीवनशैली पाहून त्यांना तिच्या आरोग्याविषयी काळजी वाटू लागली होती.
‘साऊथ चायना मॉर्निंग’पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, जोउ दररोज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करते. आपली मुलीला कोणत्याही सुट्टीशिवाय इतकं राबताना पाहून आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. आईने जेव्हा जोउला नोकरीविषयी प्रश्न विचारला, तेव्हा तिनेसुद्धा नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र राजीनामा न देण्यामागचं कारणही तिने आईला सांगितलं. जोउने सांगितलं, “मी माझ्या नोकरीमुळे खूप वैतागले आहे. पण मला नोकरीतून 1400 डॉलर (1.16 लाख रुपयांपेक्षा अधिक) वेतन मिळणं बाकी असल्याने मी राजीनामा देऊ शकत नाहीये. त्यामुळे मला पूर्ण पगार मिळेपर्यंत तिथेच काम करावं लागणार आहे.”
जोउने आईला नोकरी न सोडण्यामागचं कारण सांगितल्यानंतर आई तिथून निघून गेली. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा जोउचे डोळे उघडले, तेव्हा तिच्या बँक अकाऊंटमध्ये जवळपास सव्वा लाख रुपये जमा केल्याचं दिसून आलं. हे पैसे तिला तिच्या आईनेच पाठवले होते. त्यानंतर आईने फोन करून तिला सांगितलं की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ती नोकरी सोडून दे. “माझ्यासाठी तुझं स्वास्थ्य जास्त महत्त्वाचं आहे. काही काळ ब्रेक घे आणि त्यानंतर दुसरी नोकरी शोध. मात्र सध्या तू तुझ्या आरोग्याकडे लक्ष दे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तुला चिंता करण्याची गरज नाही”, असं आई जोउला सांगते.
आईवडिलांकडून मिळालेला हा पाठिंबा पाहून जोउ भावूक झाली. “मी कितीही मोठी झाले तरी त्यांच्या नजरेत मी नेहमीच त्यांची लाडकी लेक असेन. माझी आई नेहमीच माझी काळजी घेते. तिने केलेली ही मदत मी कधीच विसरू शकत नाही”, असं जोउ चीनी सोशल मीडियावर म्हटलंय.