Viral Video : नवीन आणलेल्या कारवर दुसऱ्या दिवशी पडले स्क्रॅचेस; शेजाऱ्यांनीच….नेटकऱ्यांचा संताप
नवीन कार घरी आणल्यानंतर बाहेर उभी असताना, दुसऱ्याच दिवशी कोणीतरी तिच्यावर मोठंमोठे स्क्रॅचेस मारले.शेजाऱ्यांनीच हे काम केल्याचा दावा केला जातोय.सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

स्वत:च्या मेहनतीचे पैसे साठवून नवीन गाडी घ्यायची, घरी गाडी आणल्यावर तिच ताटात स्वागत करायचं, मिठाई वाटायची, सगळ्यांना दाखवायची… हा क्षण सर्वांसाठी खास असतो. पण समजा वाहन घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्यावर कुणीतरी ओरखडे मारायचे? असं झालं की हार्टब्रेक होईलच ना? असंच काहीसं एका व्यक्तीच्या शेजाऱ्याने केलं आहे. नवीन गाडी घेतल्यानंतर ती रात्रभर घराबाहेर उभी होती. मात्र सकाळी तिच्यावर मोठे ओरखडे दिसले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 13 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आधी नवीन मारूती कार घेतल्याचा आनंद साजरा करताना एक व्यक्ती दिसते आहे. कारसमोर नारळ फोडून तिचं जल्लोषात स्वागत केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतं आहे.तिथं काही लोकही दिसतं आहेत. मात्र पुढच्या दृश्यात सकाळी त्याच कारवर ठिकठिकाणी ओरखडे पडल्याचं दाखवण्यात आलं आहे.
हा व्हिडिओ लक्षय मेहता नावाच्या एक्स वापरकर्त्याने शेअर केला आहे. कारवर कोणीतरी धारदार वस्तूने ओरखडे मारल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पोस्टमध्ये शेजाऱ्याने कारवर ओरखडे मारल्याचा दावा करण्यात आलाय. पण हे नुकसान नेमकं कोणी केल? त्यामागंच कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही.
शेजाऱ्यांचा जळफळाट कि पार्किंगचा वाद?
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.काही जणांनी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याऐवजी नुकसान करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी गाडी कुठे पार्क केली होती असा प्रश्न केला आहे. घराबाहेर कार उभी केल्यामुळे शेजाऱ्यांना त्रास झाला असेल किंवा पार्किंगवरून वाद झाला असेल, अशी शक्यताही काहींनी व्यक्त केली आहे. मात्र व्हिडिओ पाहून शेजाऱ्यांनीच जळफळाटातून कार खराब केली. असा निष्कर्ष काढता येत नाही. या घटनेची जागा आणि नुकसान करणाऱ्या व्यक्तीची ओळखही स्पष्ट झालेली नाही.
या व्हिडिओमुळे नवीन वाहनाची सुरक्षित पार्किंग आणि शेजाऱ्यांमधील वाद यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. दुसऱ्याच्या वस्तूचं नुकसान करणं चुकीचंच, पण नेमकं काय घडलं, हे समोर आल्याशिवाय कोणालाही दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही.