Naseeruddin Shah : बेकायदेशीर सत्ता, तुमची बेईमानांची पलटण…नसरुद्दीन शाह यांनी मोदी सरकारवर ओढले ताशेरे, काय घडलं?
Naseeruddin Shah On Modi Government : नसीरुद्दीन शाह यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले असून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे.

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या बाजूनं आवाज उठवला असून सरकारला प्रश्न विचारले आहेत. दिल्लीतील काही विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं असून. यापूर्वीही या अभिनेत्यानं कोलकातातील विद्यार्थ्यांच्या बाजूनं आवाज उठवला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. नसीरुद्दीन शाह म्हणाले की, ‘मी अभिमानाने सांगतो की मी दिमागी नक्षल (वैचारिक नक्षलवादी) आहे.’
काय म्हणाले नसीरुद्दीन शाह?
‘दिमागी नक्षलप्रमाणे चौकीदारानं मला आणखी कोणकोणती पदे किंवा विशेषणे दिली आहेत, हे मला माहीत नाही. देशद्रोही, तुकडे-तुकडे गँग आणि काय काय…पण जर या देशात खरंच कोणी ‘तुकडे-तुकडे गँग’ असेल, तर ती ही बेकायदेशीर सत्ता आहे. मी या सरकारला प्रश्न विचारू इच्छितो की, तुम्ही अजून काय काय करणार आहात? आमच्या देशातील तरुणांची हिंमत तोडण्यासाठी, शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आणि लोकशाहीला धोक्यात आणण्यासाठी तुम्ही अजून कुठवर जाणार आहात? तुम्ही आणि तुम्ही गोळा केलेली ही बेईमानांची पलटण आणखी काय करणार आहे?’
‘आधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), मग सत्यजित रे इन्स्टिट्यूट आणि आता जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर जो अत्याचार सुरू आहे, तो नेहमी लक्षात ठेवलं जाईल. सगळं काही लक्षात ठेवलं जाईल! तुम्हाला जे करता येतंय, ते करा. भाजपाच्या आयटी सेलनं जे काही करायचे आहे ते करत राहावं. तुमची पूर्ण ताकद लावा. पण यामुळे ना देशातील तरुणांचं धैर्य खचणार आहे, ना आपल्या शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त होणार आहेत आणि ना आपली लोकशाही धोक्यात येणार आहे. जे करायचं आहे ते करा, देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है. आजच्या तरुणांच्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे.’ असं नसीरुद्दीन यांनी शेवटी म्हटलं.
दरम्यान, विद्यार्थी संघटना पुन्हा स्थापन करण्याच्या मागणीसाठी तीन विद्यार्थ्यांनी १२ ऑक्टोबर रोजी उपोषण सुरू केलं, तेव्हा या आंदोलनाला सुरुवात झाली. २१ ऑक्टोबर रोजी विद्यापीठानं विद्यार्थी संघटनेची घटना तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्यानंतर चार विद्यार्थ्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलं. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी पहाटे ४ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या वाटाघाटीनंतर दोन विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतलं, तर अबिन बासिल आणि रेहान खान उपोषणावर कायम राहिले.
