जुनी जीन्स ठरू शकते कमाईची संधी, ‘या’ 4 गोष्टींपासून सुरू करा घरबसल्या छोटा व्यवसाय
कपाटात तशाच पडून असलेल्या जुन्या जीन्स फेकून देण्याऐवजी त्यापासून स्टायलिश पाऊच, की-चेन आणि इतर वस्तू तयार करून घरबसल्या छोटा व्यवसाय सुरू करा. यासाठी लागणाऱ्या 4 गोष्टी आणि व्यवसायाची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

कपाटाची साफसफाई करताना अनेकदा जुन्या जीन्स सापडतात. काही जीन्स वर्षानुवर्षे न वापरता तशाच पडून असतात, तर काही खराब झाल्यामुळे घालता येत नाहीत. अशा जीन्स फेकून देण्याऐवजी थोडी आयडिया वापरून त्यापासून उपयोगी वस्तू तयार करता येतात आणि तुम्हाला त्यातून एक छोटासा घरबसल्या व्यवसायही सुरू करता येतो.
डेनिमचे कापड हे मजबूत असल्यामुळे त्यापासून अनेक आकर्षक वस्तू बनवता येतात. अशातच तुम्हाला जर घरबसल्या पैसे कमवायचे असतील तेही स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर डेनिमच्या कापडापासून तुम्ही अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या रोजच्या वापरात असतात त्या आकर्षक पद्धतीने सहज बनवू शकतात. विशेष म्हणजे यासाठी मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. तयार केलेल्या वस्तू तुम्ही ऑनलाइन किंवा स्थानिक बाजारात विकून कमाईची संधी निर्माण करू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण डेनिमच्या कापडापासून कोणत्या स्टायलिश वस्तू बनवू शकतो ते जाणून घेऊयात.
1. डेनिम कोस्टर
जुन्या जीन्सचा पायाचा भाग कापून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करा. कडांचे काही धागे काढून त्याला झालरीसारखा लूक देऊ शकता. अशा चार कोस्टरचा सुंदर सेट तयार करून आकर्षक पॅकिंगमध्ये विकता येईल.
2. कॉर्ड ऑर्गनायझर
फोनचा चार्जर, इअरफोन किंवा इतर वायर नेहमी गुंततात. यासाठी जुन्या जीन्सच्या छोट्या पट्ट्या कापून दोन्ही टोकांना स्नॅप बटण लावा. तयार झाला छोटासा आणि उपयोगी कॉर्ड ऑर्गनायझर. कमी खर्चात तयार होणारी ही वस्तू सहज विकता येऊ शकते.
3. डेनिम की-रिंग
उरलेल्या डेनिमच्या पातळ पट्ट्यांचा वापर करून आकर्षक की-रिंग किंवा टॅसल बनवता येतात. वरचा भाग धाग्याने घट्ट बांधा आणि वेगवेगळ्या रंगांचे धागे वापरून त्याला आकर्षक रूप द्या. या की-रिंग्स बॅग किंवा चाव्यांना लावता येतात.
4. जीन्सच्या खिशाची छोटी पिशवी
जुन्या जीन्सचा मागचा खिसा कापून त्यापासून छोटी पिशवी तयार करता येते. वरच्या बाजूला चुंबकीय बटण लावल्यास त्यात नाणी, पैसे, इअरबड्स किंवा छोट्या वस्तू ठेवता येतील.
तर या तुमच्या हाताने बनवलेल्या वस्तू तुम्ही सोशल मीडिया, मोबाईलच्या व्हॉट्सॲप ग्रुप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहज विकू शकता. वस्तूंचे फोटो काढताना त्या वापरात कशा दिसतात हे दाखवणे महत्त्वाचे आहे. जसे की कोस्टरवर कप ठेवून किंवा कॉर्ड ऑर्गनायझरमध्ये चार्जर लावून फोटो काढा. अशा फोटोमुळे ग्राहकांना वस्तूचा उपयोग आणि आकर्षकता दोन्ही सहज समजतात, त्यामुळे खरेदीची शक्यता वाढू शकते.
अशा प्रकारे कपाटात पडलेल्या जुन्या जीन्सला फेकून देण्याऐवजी उपयोगी आणि विक्रीयोग्य वस्तूंमध्ये बदलून कमाईचे साधन बनवता येते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)