Post Office : आता घरबसल्या उघडा ‘एनपीएस’चं खातं; ग्राहकांसाठी पोस्ट ऑफीसची नवी सुविधा

| Updated on: Apr 29, 2022 | 1:50 PM

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे खाते तुम्ही घरबसल्या काढू शकता. त्यासाठी टपाल कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. किमान शुल्क भरून एनपीएसचे खाते उघडू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 80सीसीडी 1 (बी) अंतर्गत करसवलत मिळते.

Post Office : आता घरबसल्या उघडा एनपीएसचं खातं; ग्राहकांसाठी पोस्ट ऑफीसची नवी सुविधा
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: TV9
Follow us on

टपाल खात्याने (Post Office) ग्राहकांना अनोखी भेट दिली आहे. आता राष्ट्रीय पेन्शन योजनेचे (National Pension Scheme) खाते
ऑनलाईन पद्धतीने उघडता येईल. घरबसल्या काही क्लिकवर ही सेवा प्राप्त करता येईल. ग्राहकाला डिजिटल पद्धतीने पोस्ट ऑफिसंतर्गत एनपीएसची ऑनलाइन सदस्यता घेता येईल. पोस्ट विभाग राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ऑल सिटिझन मॉडेल स्कीमसाठी ऑनलाइन सेवा प्रदान करते. ही भारत सरकारची एक ऐच्छिक पेन्शन योजना आहे, जी पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे व्यवस्थापित केली जाते. टपाल कार्यालय 2010 पासून आपल्या निवडक पोस्ट ऑफिसद्वारे फिजिकल मोडमध्ये NPS प्रदान करीत आहे. परंतु आता पोस्ट कार्यालयाने 26 एप्रिल 2022 पासून ऑनलाइन पद्धतीने एनपीएसचे सदस्यत्व देण्यास सुरुवात केली आहे. आता 18 ते 70 वयोगटातील भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या www.indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नॅशनल पेन्शन सिस्टिम ऑनलाईन सर्व्हिसेस मेन्यूला भेट देऊन ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन भविष्यातील आर्थिक नियोजन करु शकतो.

सेवा शुल्क सर्वात कमी

एनपीएस ऑनलाइन अंतर्गत, ग्राहकांना नवीन नोंदणी, प्रारंभिक किंवा त्यानंतरचे योगदान आणि कमीतकमी शुल्कात एसआयपी (SIP) पर्याय यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा एनपीएस सेवा शुल्क सर्वात कमी असल्याचा दावा पोस्ट खात्याने केला आहे.

एनपीएस म्हणजे काय

एनपीएस ही कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेतन देण्याची योजना आहे. नियमानुसार एनपीएसमधून 60 वर्षे किंवा निवृत्त होण्यापूर्वी पैसे काढता येत नाहीत. पण आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणुकदारांना या पेन्शन फंडातून पैसे काढता येतात. एनपीएसमध्ये एका वर्षात किमान 1 हजार रुपये आणि हवी तेवढी जास्तीत जास्त रक्कम जमा करता येते. एनपीएसची दोन प्रकारची खाती आहेत, टियर 1 आणि टियर 2 या नावाने. टियर 1 हे संपूर्ण निवृत्ती खाते असून त्यातून वयाच्या 60 व्या वर्षापूर्वी पैसे काढण्याचा नियम नाही. दुसरीकडे, टियर 2 खाते आपल्याला एनपीएस पैसे काढण्याची सुविधा देते.

आवश्यक कागदपत्रे

खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आणि नेट बँकिंग सुविधा असलेले सक्रिय बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदाराने पॅन नंबरसह वैयक्तिक पेन्शन खाते उघडण्याचा निर्णय घेतल्यास, पी.एन.ए.आर. सक्रिय असणे आवश्यक आहे. एनपीएस खाते घरी बसून काढता येते आणि त्यात रक्कम जमा करता येते.

खाते बंद करण्याचा नियम

एखाद्या व्यक्तीला एनपीएसमधून माघार घ्यायची असेल तर काही अटी असतात. पीएफआरडीएनुसार एनपीएसचा लॉक-इन कालावधी 5 ते 10 वर्षांचा असतो. जर एखाद्या सदस्याला एनपीएस खाते बंद करायचे असेल तर त्याला खाते चालवल्यानंतर 5 वर्षानंतर ही सुविधा मिळेल. म्हणजेच एनपीएस खाते 5 वर्षानंतरच बंद करता येणार आहे. स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांसाठी हा नियम आहे. तुम्ही पगारदार असाल तर तुम्हाला 10 वर्ष खाते सुरू ठेवावे लागते. त्यानंतरच खाते बंद होऊ शकते. यालाच प्री-मॅच्युअर एक्झिट म्हणतात.