आमचा भाऊ गेला, महिला- भगिनींचा टाहो! कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी मोठी गर्दी
अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. काटेवाडी येथे त्यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली असून, अनेक कार्यकर्ते शोकाकुल झाले आहेत. शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब आणि सामान्य जनतेनेही लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली. बारामती आज पूर्णतः शोकसागरात बुडालेली आहे.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (plane accident) संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्र शोकात बुडाला आहे. काटेवाडी येथील त्यांच्या मूळ गावी आणि नंतर विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेने प्रचंड गर्दी केली आहे. अजित दादांसारखा नेता होणे नाही, अशी भावना प्रत्येक जण व्यक्त करत आहे.
अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काटेवाडीनंतर पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे नेण्यात येणार आहे, जिथे अंत्यसंस्कार पार पडतील. शरद पवार हे देखील काटेवाडीसाठी रवाना झाले असून, संपूर्ण पवार कुटुंब या दुःखात एकत्र आहे. शरद पवार यांनी अजित पवारांना स्वतःच्या मुलाप्रमाणे पाहिले होते, त्यामुळे ते पूर्णतः खचून गेल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांना शिस्त शिकवणारे अजित पवार हे आज शिस्तबद्ध रांगेत उभे असलेल्या कार्यकर्त्यांमधून आजही दिसत आहेत.

