राज्यपालांची टोपी आणा.. 1 लाखाचे बक्षीस मिळवा, कुणी दिली ऑफर?

उस्मानाबादेतही आंदोलन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

राज्यपालांची टोपी आणा.. 1 लाखाचे बक्षीस मिळवा, कुणी दिली ऑफर?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2022 | 3:20 PM

महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून टीकेची झोड उठली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अपमान होईल, असं वक्तव्य कऱणाऱ्या राज्यपालांचा (Maharashtra Governor) निषेध व्यक्त केला जातोय. बीड शिवसेनेच्या वतीनेही आज भगतसिंह कोश्यारी यांना इशारा देण्यात आला.

बीड शिवसेना-ठाकरे गट जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग या महाराष्ट्रात आहे. छत्रपतींची आणि डॉ. आंबेडकरांची तुलना इथे करण्यात आली. त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. राज्यपालांची काळी टोपी जे आणून दाखवेल, त्याला १ लाख रुपयांचे बक्षीस बीड शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर करतोय, असं आवाहन जगताप यांनी केलंय.
पक्षाने तसेच पंतप्रधानांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात आणि देशात कुणी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. आधीच्या काळी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा आदर्श होता. मात्र आता नितीन गडकरी, शरद पवार हेच आदर्श आहेत, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं. शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकरांची तुलना गडकरी आणि पवार यांच्याशी केल्यामुळे राज्यभरातून कोश्यारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

उस्मानाबादेतही आंदोलन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे धोतर फेडून व पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते यांनी शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन केले. विषारी कोश्यारी हटाओ असे बॅनर लावून त्रिवेदी यांचा पण निषेध केला.

मनसे आमदार राजू पाटील यांनीही राज्यपालांसह भाजपला टोला लगावला असून कोश्यारी इथे आले, पण होशियारी तिकडेच ठेऊन गेलेत’ आम्ही बोलण्यापेक्षा भाजपने बोलायला पाहिजे, असे राजू पाटील म्हणाले.