Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं

दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंना महागाईचा मोठा फटका बसला आहे. दुष्काळ आणि कमी पावसामुळे तांदळाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने किलोमागे 25 ते 30 रुपयांनी दर वाढले आहेत. डाळींचे भावही वाढले असून, यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

महाराष्ट्रात सध्या दुष्काळ आणि कमी पावसामुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, ज्याचा थेट फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. दिवाळी तोंडावर असताना तांदळाचे दर प्रति किलो 25 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. तांदळाच्या उत्पादनात 50 ते 60 टक्क्यांनी घट झाल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे समोर आले आहे.

गेली 40 वर्षे तांदळाचा व्यापार करणारे सतीश सावजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पन्न घटल्याने तांदळाचे भाव वाढले आहेत. ग्राहक इतक्या मोठ्या दरवाढीमुळे त्रस्त असून, त्यांना प्रतिसाद देताना व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. एक कट्टा किंवा दोन कट्टे तांदूळ घेणारे ग्राहक आता केवळ 10 किलो तांदूळ खरेदी करत आहेत.

Loading...

तांदळाबरोबरच डाळींच्या दरातही 5 ते 10 रुपयांनी वाढ झाली आहे, तर तेलाचे दर सध्या स्थिर आहेत. पुढील 5-6 महिने तरी तांदळाचे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापारी सावजी यांनी सांगितले. सरकारने साठवणुकीवर मर्यादा (200 टन) घालून काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ठरत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us