आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. विशेष म्हणजे महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच त्यांनी मनातील सल बोलून दाखवली. राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावं लागतोय. आजही महिलांना राजकारणात काम करताना संघर्ष करावा लागतो. एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केलं जातं. मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
मंदा म्हात्रे यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपमध्येच अशा प्रकारे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं वातावरण आहे. मंदाताईंना स्वत:ला काही अनुभव आले असतील तर त्यांच्याशी बोलू. आमच्यासारख्यांचा प्रवास त्यासाठीच आहे. आज तुम्ही बघितलं, मी कार्यकर्त्यांना भेटलो त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यामुळे कार्यकर्त्याला मोकळेपणाने बोलायला लावणं आणि त्याच्या बोलण्यातून आलेल्या समस्या सोडवणं ही आमची कार्यपद्धती आहे. मंदाताई आणि देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत चांगला संवाद आहे. त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेऊ, असं पाटील म्हणाले.