उस्मानाबाद : खरीप उत्पादनाच्या आशा संपुष्टात, प्रकल्पातील पाणीही शेतातच

| Updated on: Sep 28, 2021 | 3:55 PM

पावसाचे पाणी तर शेतामध्ये साचलेले आहेत शिवाय लहान-मोठे प्रकल्पातूनही आता पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आता पावसाने उघडीप दिली तरी पिक हाती लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद : खरीप उत्पादनाच्या आशा संपुष्टात, प्रकल्पातील पाणीही शेतातच
मांजरा प्रकल्पातील पाणी शेतामध्ये प्रवाहीत झाल्याने पिकाचे नुकसान
Follow us on

उस्मानाबाद : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेल्या पावसामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होऊ लागले होते. मात्र, मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. काढणीला आलेली पिके पदरात पाडून घेण्यासाठीची लगबग सुरु झाली परंतु, जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा कहर सुरु झालाय. पावसाचे पाणी तर शेतामध्ये साचलेले आहेत शिवाय लहान-मोठे प्रकल्पातूनही आता पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आता पावसाने उघडीप दिली तरी पिक हाती लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात पावसाची वार्षीक सरासरी ही 603 मिलीमीटर एवढी असून आतापर्यंत 130 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पाऊस लागून राहिल्याने शेतकऱ्यांची शेती कामे ही रखडलेली आहेत. जिल्ह्यात खरीपात सोयाबीन हे मुख्य पिक आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाचा अनियमितपणा शेतकऱ्यांना चांगलाच भोवला आहे. पावसाने ओढ दिल्याने पेरण्या ह्या वेळेत तर झाल्या नाहीत. परंतू, पिक ऐन जोमात असताना पावसाने हुलकावणी दिली होती.

ऐन जोमात असलेल्या पिकांचे आता अधिकच्या पावसामुळे नुकसान होऊ लागले आहे. जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, कळंब या तालु्क्यातील शेतीमध्ये पाणी साचून राहिलेले आहे. त्यामुळे काढणी कामे तर रखडलेली आहेतच पण शेतकऱ्यांना शेतामध्य़े मार्गस्थ होणेही मुश्किल होत आहे. सोयाबीन पाण्यात असून आता त्याची पुन्हा उगवण होऊ लागली आहे. चार दिवस अशीच परस्थिती राहीली तर पुन्हा पिकांची काढणी करुनही उपयोग होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

खरीपातील सोयाबीन आणि उडदाला पावसाचा अधिकचा फटका बसलेला आहे. आता पावसाचा धोका केवळ खरीपातील पिकांना होता मात्र, जिल्ह्यातील प्रकल्पही तुडुंब भरली असल्याने आता नदी लगतच्या ऊसाच्या क्षेत्रातही पाणी शिरत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरीही चिंतेत आहे.

निम्न तेरणाच्या 14 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

उस्मानाबाद जिल्ह्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे 14 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे लगतच्या शेतामध्ये पाणी शिरत असल्याने पिके तर पाण्यात आहेत शिवाय शेत जमिनही खरडून जात आहे. 10 सेंटीमिटरने हे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

वाकडी गावात शिरले मांजरा नदीचे पाणी

मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे मात्र, कळंब तालुक्यातील वाकडी येथील काही घरांना पाण्याचा विळखा पडला होता. भयभित झालेले नागरिक हे घराच्या छतावर जाऊन बसले होते. दरम्यान, याची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली होती. अखेर एनडीआरएफ च्या टीमला पाचारण करावे लागले होते. त्यांच्या मदतीने घराच्या छतावर अडकलेल्या नागरिकांना सुखरुप काढण्यात आले. तर कळंब-ढोकी, कळंब अंबाजोगाई हे मार्ग सोमवारी सकाळी बंद होते. पावसाने पिकाचे तर नुकसान झाले आहेच शिवाय आता जनजीवनही विस्कळीत होऊ लागले आहे. (Osmanabad: Kharif production hopes run out, water from project in farm)

संबंधित बातम्या ;

शेतकऱ्यांसाठी नवी 35 पिके, पंतप्रधान मोदींनी दिला उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांना ‘कानमंत्र’

सोलापूर : शेंगासह सोयाबीन पाण्यात, सांगा शेती करायची कशी?

कोल्हापूरातही ‘लातूर पॅटर्न’, ‘केडीसी’ देणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीककर्ज