पिकाचं नुकसान झाल्यावर विम्याचे पैसे मिळणार कसे? असा करा क्लेम
PMFBY Claim: पिकांचं नुकसान झाल्यावर पीक विम्यासाठी दावा दाखल करता येतो. नुकसान भरपाई मागता येते. पण त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सर्व माहिती देणे आवश्यक आहे. कशी आहे ही प्रक्रिया? जाणून घ्या.

यंदा पावसाने कमाईचे सर्व गणित बिघडवलं आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. अशा स्थिती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) राबवते. पण नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. विमा दावा कसा दाखल करायचा आणि इतर प्रक्रियेविषयी जाणून घेणे फायद्याचे ठरेल.
72 तासांच्या आता माहिती देणे बंधनकारक
पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तीन दिवसांच्या आत, 72 तासात या नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपनीला, अथवा कृषी विभागाला कळवणे बंधनकारक आहे. उपलब्ध टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून विमा योजना ॲपद्वारे अथवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदवणे फायद्याचे ठरेल.
ही कागदपत्रे जोडा
विमा मंजूरीसाठी शेतकऱ्यांनी काही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यामध्ये 7/12, 8-अ उतारा, बँक पासबुकची प्रत, आधार कार्ड, पीक पेरणीचा दाखला आणि पीक विमा भरल्याची पावती यांचा समावेश होतो.
नुकसानीचा पंचनामा आणि पाहणी
तक्रार झाल्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाचे अधिकारी संयुक्तपणे शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करतात. शेताचे आणि पिकाचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून जवळ बाळगा. यामुळे दाव्याचा निपटारा लवकर होण्यास मदत होईल.
दाव्याची स्थिती तपासा
पाहणी अहवालानंतर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई निश्चित होते. शेतकरी त्यांच्या अर्जाची स्थिती क्रॉप इन्शुरन्स ॲपवर अथवा संबंधित विमा कंपनीच्या साईटवर त्या अर्जाचा क्रमांकाचा वापर करून तपासू शकतात.
विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि क्लेम मंजूर झाल्यावर विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT मार्फत थेट जमा केली जाते. पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी तातडीने तक्रार नोंदवणे आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे . पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी PMFBY Crop Insurance ॲपवर अर्ज करता येईल. एका विहित मुदतीत हे अर्ज स्वीकारले जातात. तर कधी कधी मुदतही वाढवली जाते.