Car Price Hike : टाटा नंतर किआ मोटर्सचा दरवाढीचा गिअर! हे मॉडेल होणार महाग

Car Price Hike : ऐन सणासुदीत तुमच्या कारच्या स्वप्नासाठी जादा पैसा खर्च करावा लागू शकतो. टाटा मोटर्सनंतर किआ मोटर्सने पण दरवाढीचा गिअर टाकला आहे. किआचे दोन मॉडेल्स आता ग्राहकांना महाग मिळतील. त्यासाठी जादा पैसा खर्च करावा लागेल. कधीपासून होणार ही दरवाढ लागू?

Car Price Hike : टाटा नंतर किआ मोटर्सचा दरवाढीचा गिअर! हे मॉडेल होणार महाग
| Updated on: Sep 21, 2023 | 7:24 PM

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : तुमचे कारचे स्वप्न महाग होऊ शकते. कारच्या किंमतीत वाढ होणार आहे. काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्सने त्यांच्या कारच्या किंमती वाढवल्या होत्या. कारची किंमत वाढवल्याने ग्राहक सतर्क झाले होते. आता हाच कित्ता इतर कंपन्या पण गिरवत आहेत. टाटा नंतर किआ इंडियाने पण कारच्या दरवाढीचा गिअर टाकला. कंपनीने त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ऐन सणासुदीत ही घोषणा झाली आहे. ग्राहकांना किआच्या या दोन मॉडेलसाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे. त्यांचे कारचे स्वप्न महागणार (Car Price Hike) आहे. या महिन्यापासून ही दरवाढ लागू होत आहे. या वर्षी एप्रिल महिन्यानंतर अनेक कंपन्यांनी कारच्या किंमतीत वाढ केली आहे.

पुढील महिन्यात दरवाढ

ऑटोमेकर किआ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, पुढील महिन्यात, 1 ऑक्टोबरपासून किआ इंडिया काही मॉडेल्सच्या किंमती वाढवणार आहे. यामध्ये सेल्टोस आणि कॅरेन्स या मॉडेलचा समावेश आहे. या मॉडेल्ससाठी ग्राहकांना 2 टक्के जादा रक्कम मोजावी लागेल. कंपनीने एंट्री लेव्हल मॉडेल Sonet च्या किंमतीत वाढ केलेली नाही. कच्चा माल आणि निर्मिती खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात वाढ

किआ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख (विक्री आणि विपणन) हरदीप एस बरार यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून सेल्टॉस आणि कॅरेन्स या कारच्या मॉडेलमध्ये 2 टक्के वाढ करण्याचा विचार सुरु आहे. कंपनीने यापूर्वी एप्रिल महिन्यात किंमतीत वाढ केली होती. आता सरकारच्या नवीन निकषावर उतरण्यासाठी ही दरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

अनेक कारणे समोर

कंपनीनुसार, एप्रिलनंतर इतर कंपन्यांनी किंमतीत वाढ केली होती. पण किआ इंडियाने मध्यंतरी कारच्या किंमती वाढवल्या नाही. आता कच्चा मालात वाढ झाली आहे. नवीन फीचरसह सेल्टॉस बाजारात येत आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागली आहे. त्यामुळे आता दरवाढीशिवाय कंपनीसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ही दरवाढ करण्यात येत आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीचा कार बुक करण्यासाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे.