दिवाळीत कार घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, डिस्काउंटच्या नादात होऊ शकते फसवणूक

दिवाळीत तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोठ्या डिस्काउंटच्या नादात पडू नका. होऊ शकतो फसवणूक. गाडी घेण्यापूर्वी तपासा या गोष्टी.

दिवाळीत कार घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, डिस्काउंटच्या नादात होऊ शकते फसवणूक
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 05, 2026 | 3:29 PM

दिवाळीचा सण जवळ आला की ऑटोमोबाईल कंपन्या आणि कार डीलरशिप ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर करतात. त्यामुळे अनेकजण नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करण्यासाठी सणासुदीच्या काळाला प्राधान्य देतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हजारो रुपयांची सूट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि मोफत अ‍ॅक्सेसरीज अशा अनेक ऑफर्स दिल्या जातात.

मात्र, या आकर्षक ऑफर्सच्या मागे काही अटी आणि अतिरिक्त खर्च लपलेले असू शकतात. त्यामुळे मोठ्या डिस्काउंटच्या मोहात घाईने निर्णय घेतल्यास ग्राहकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. दिवाळीत नवीन गाडी खरेदी करताना कोणत्या सहा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घेऊया.

Loading...

डिस्काउंटच्या नादात जुनी गाडी खरेदी करू नका

दिवाळीच्या काळात अनेक डीलर्स जुन्या स्टॉकमधील गाड्या विकण्यासाठी मोठी सूट देतात. काही गाड्यांचे मॉडेल नवीन असले तरी त्यांची मॅन्युफॅक्चरिंग तारीख मागील वर्षातील असू शकते. त्यामुळे गाडी खरेदी करण्यापूर्वी तिचा मॅन्युफॅक्चरिंग महिना आणि वर्ष तपासा. केवळ मोठी सूट मिळतेय म्हणून जुनी गाडी खरेदी करू नका. जुन्या स्टॉकची किंमत आणि नवीन स्टॉकची किंमत यांची तुलना करूनच निर्णय घ्या.

मोफत अ‍ॅक्सेसरीजच्या नावाखाली वाढीव बिल देऊ नका

दिवाळी ऑफरमध्ये अनेक शोरूमकडून सीट कव्हर, फ्लोअर मॅट, बॉडी कव्हर आणि मड फ्लॅप यांसारख्या अ‍ॅक्सेसरीज मोफत देण्याचे सांगितले जाते. मात्र, काही वेळा या वस्तूंचे पैसे इतर चार्जेसच्या स्वरूपात बिलामध्ये जोडले जातात. त्यामुळे कोणत्या अ‍ॅक्सेसरीज खरोखर मोफत आहेत आणि कोणत्या वस्तूंसाठी पैसे आकारले जाणार आहेत, याची आधीच माहिती घ्या.

कार इन्शुरन्स घेताना इतर कंपन्यांचे दर तपासा

कार खरेदी करताना शोरूमकडून इन्शुरन्स घेण्याचा पर्याय दिला जातो. मात्र, घाईमध्ये अनेक ग्राहक इतर विमा कंपन्यांचे दर तपासत नाहीत. प्रत्यक्षात वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रीमियम आणि सुविधांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे शोरूमने दिलेल्या इन्शुरन्सची तुलना इतर कंपन्यांच्या कोटेशनशी करा. पॉलिसी घेताना IDV, झिरो डेप्रिसिएशन आणि इतर अ‍ॅड-ऑन कव्हरची माहिती तपासा. केवळ कमी प्रीमियम पाहून इन्शुरन्स निवडू नका.

एक्सचेंज बोनसच्या अटी समजून घ्या

जुनी गाडी देऊन नवीन कार खरेदी करताना अनेक डीलर्स एक्सचेंज बोनस देतात. मात्र, हा बोनस प्रत्येक ग्राहकाला मिळेलच असे नाही. जुन्या गाडीचे वय, वैध कागदपत्रे आणि एक्सचेंज प्रक्रियेशी संबंधित काही अटी लागू असू शकतात. त्यामुळे एक्सचेंज करण्यापूर्वी आपल्या जुन्या गाडीची बाजारातील किंमत वेगवेगळ्या ठिकाणी तपासा. केवळ बोनसच्या मोहात जुनी गाडी कमी किमतीत विकू नका.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us