
मुंबई : एकेकाळी कार रिवर्स घेणं हे खरचं कौशल्याचं काम होतं. ज्याच्यामध्ये रिवर्स ड्रायव्हिंग स्किल असायचे त्याचं कारमध्ये बसलेल्यांकडून तोंडभरून कौतुक व्हायचं. याचं कारण म्हणजे कार रिव्हर्स घेणं हे खरचं जोखमीचं काम आहे. मात्र आता अनेक कारमध्ये रिवर्स कॅमेरा आल्याने ही जोखीम कमी झाली. मात्र यापुठे जावून टेक्नॉलॉजी आणखी अपग्रेड झाली आहे. आजकाल वाहनांमध्ये 360 डिग्री कॅमेरा सेटअप सामान्य होत आहे. जर तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा जास्त बजेटच्या कार खरेदी केल्या तर तुम्हाला ही वैशिष्ट्ये बहुतेक वाहनांमध्ये आढळतील. ऑटो एक्सपर्ट शशिकांत कुळकर्णी यांच्याकडून आपण 360 डिग्री कॅमेरा (360 Degree camera) आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
तुम्ही जर नागपूर, पुणे किंवा मुंबई सारख्या शहरात राहात असाल तर हमखास तुमची कार ट्राफिक जाममध्ये अडकत असेल. चारचाकी वाहानांची संख्या दिवसंदिवस वाढत असल्याने रस्त्यांवर गर्दी वाढू लागली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागतोय. ट्रॅफिक दरम्यान प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, अशा परिस्थितीत अनेक वेळा गाडीला स्क्रॅच होते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या वाहनात 360 डिग्री कॅमेरा सेटअप असेल तर ते तुम्हाला खूप मदत करते. कारमध्ये बसून तुम्ही बाहेर चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवू शकता.
360 डिग्री कॅमेरा सेटअप वाहनाच्या विविध भागांमधील काही कॅमेरे एका सॉफ्टवेअरद्वारे जोडलेले आहेत जे कारच्या आजूबाजूच्या हालचाली एकाच स्क्रीनवर आपल्यासमोर आणतात. 360 डिग्री कॅमेरा सेटअपमध्ये कमीतकमी 4 कॅमेरे असतात, एक समोर, एक मागील बंपरवर आणि दोन साइड मिररवर. या सर्व कॅमेर्यांचे व्हिज्युअल एकत्र पाहिले असता, ड्रायव्हरला त्याच्या सीटवर बसून वाहनाभोवतीचे दृश्य पाहता येते. काही महागड्या वाहनांमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप देखील लावलेला असतो.
360 डिग्री कॅमेरा सेटअप लावायला वेगवेगळा खर्च येतो. हे खर्चीक जरी असलं तरी गर्दीत गाडीला स्क्रॅच लागण्याची शक्यता कमी होते. तसेच गर्दीतून गाडी काढताना या कॅमेराचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे एकंदरीत महागाच्या गाडीत हा सेटअप लावणे फायद्याचेच आहे.