
GST Reforms : आता देशात सणासुदीची धूम पाहायला मिळेल. सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. गणेशोत्सव,नवरात्री, दसरा आणि दिवाळी असे मोठे सण या काळात येत आहे. पण या काळात बुकिंग अथवा कार विक्रीवर मोठा परिणाम होण्याची भीती कंपन्यांना वाटत आहे. त्यामागे सरकारची एक घोषणा आहे. देशभरात 15 हजारांहून अधिक डीलर्स, वितरक असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार, GST स्लॅबमध्ये बदल होण्यास उशीर झाला तर त्याचा सणासुदीतील विक्रीवर परिणाम होऊन त्यात घट येऊ शकते. सणासुदीच्या काळात कारच्या विक्रीत मोठी वाढ होते. पण दिवाळीच्या काळात वस्तू आणि सेवा करात कपातीचे संकेत मिळत असल्याने ग्राहकांनी कार खरेदीचा विचार पुढे ढकल्याचा दावा असोशिएनने केला आहे.
ग्राहकांचे वेट अँड वॉच
दिवाळीत जर जीएसटीत कपात होत असेल तर मग कपातीनंतरच कार खरेदी करण्याचा ग्राहकांचा विचार आहे. जीएसटी दरात कपातीमुळे कार आणि इलेक्ट्रॉनिक्ससह इतर अनेक वस्तू स्वस्त होऊ शकतात. त्यामुळे कार विक्रेते सध्या अडचणीत आले आहेत. कारण सणासुदीत कार, वाहनांची विक्री अधिक होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी स्टॉक वाढवला आहे. त्यात आता जीएसटी सुधारणा होण्यास उशीर झाला तर या उत्सवाच्या उत्साहावर पाणी फेरले जाणार आहे.
डीलर्स चिंतेत
FADA ने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या काळात डीलर्सवर दुहेरी संकट आले आहे. कारण पूर्वीपासूनच विक्री मंदावलेली आहे. त्यात जीएसटी कपात ही या उत्सवाच्या काळात न होता नंतर होणार असल्याचे समोर येत असल्याने ग्राहकांकडून मागणी घटली आहे. जर 45-60 दिवसात कार विक्री सुस्तावली तर डिलर्ससाठी व्याज दर वाढण्याची आणि क्रेडिट लिमिटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एफएडीएने मागणी केली आहे की, सरकारने जीएसटी परिषदेची बैठक लवकरात लवकर घ्यावी आणि जीएसटी कपातीचे धोरण लागू करावे. तर बँका आणि एनबीएफसींना डिलर्सला दिलासा देण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.
ऑटो सेक्टर संकटात
ऑटो क्षेत्र सध्या संकटात आहे. कारण बाजार अगोदरच सुस्तावलेला आहे. त्यात जीएसटी रिफॉर्मसमुळे ग्राहक खरेदीसाठी धजावत नाहीये. तर दुसरीकडे सरकारच्या E20 पेट्रोल धोरणामुळे वाहनांचे मायलेज 25 टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी ग्राहक आता अधिक विचारपूर्वक खरेदी करत आहेत.