दुष्काळाच्या नावानं 'जय श्रीराम'!

शरद जाधव, सीनियर प्रोड्युसर, टीव्ही 9 मराठी:  काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एका कार्यक्रमात ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या गाण्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या कार्यपद्धती सांगण्याचाच प्रयत्न केला होता.. काही दिवसापूर्वीचा हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुखांचा 24, 25 नोव्हेंबरचा आगामी अयोध्या दौरा. निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळं राजकीय पक्षांना, त्यातही स्वत:ला …

दुष्काळाच्या नावानं 'जय श्रीराम'!

शरद जाधव, सीनियर प्रोड्युसर, टीव्ही 9 मराठी काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एका कार्यक्रमात ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या गाण्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या कार्यपद्धती सांगण्याचाच प्रयत्न केला होता.. काही दिवसापूर्वीचा हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुखांचा 24, 25 नोव्हेंबरचा आगामी अयोध्या दौरा. निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळं राजकीय पक्षांना, त्यातही स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजप, शिवसेनेसारख्या पक्षांना पुन्हा अयोध्या आठवणं हे तर क्रमप्राप्तच आहे..पण, एका बाजूला राज्य दुष्काळात होरपळत असताना, सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आलेला राममंदिर प्रेमाचा उमाळा, न पटण्यासारखा आहे.

सध्या महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा दाह सहन करतो आहेत. शेतकऱ्याला ना खरिपाचे उत्पन्न मिळाले, ना आता रब्बीची पेरणी झाली. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळी महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु झाले आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला असताना, राज्यकर्त्यांनी यावर गंभीर होऊन दुष्काळग्रस्तांना धीर देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण, सध्या राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना खरंच दुष्काळाची चिंता आहे का हा प्रश्नच आहे.

संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली. देशभरात फटाक्यांची आतषबाजी झाली. दिव्यांच्या रोषणाई जणू काही सारा आसमंत प्रकाशमान झाला होता. पण, याच डोळे दिपवणाऱ्या दिवाळीच्या उत्साहात, दुष्काळी भागातला अंधार कुणालाच दिसला नाही.. किंबहुना कुणी तो पाहिलाच नाही. पण, आता दिवाळीनंतरही राज्यकर्त्यांना दुष्काळाऐवजी राममंदिराची जास्त चिंता आहे की काय? अशी स्थिती आहे.. एका बाजूला राज्य दुष्काळात होरपळून निघताना, अनेकांना अयोध्येच्या राममंदिरात दिवा लावण्याची घाई झाली आहे.. राममंदिर निर्माणाच्या मागणी करण्याला विरोध नाहीच.. पण, गावरान भाषेत राज्यकर्त्यांची ही कृती म्हणजे, आपले घर जळत असताना, दुसऱ्याच्या बांधकामावर पाणी मारण्यासारखीच आहे.

आयोध्येत राममंदिराचा प्रश्न आहे कोर्टाच्या अख्यत्यारित आहे. अशावेळी कोर्टाच्या निर्णयावर सारं काही अवलंबून आहे. किंवा केंद्र सरकार त्यात विधेयक आणून हस्तक्षेप करू शकतं.. खरंतर केंद्रात सत्तेत असलेली भाजप राम मंदिर निर्माणाच्या मुद्दा घेऊन निवडून आली आहे.. पण, गेली साडेचार वर्ष मोदींनी राम मंदिराच्या मुद्द्यावर चकार शब्दही काढलेला नाही.. एका बाजूला भाजप शांत असताना, शिवसेनेनं मात्र अयोध्येतील राममंदिरावरुन भाजपवर कुरघोडीची खेळी केलीय..

पण, ही वेळ राम मंदिराच्या राजकारणाची नव्हे तर राज्यातील दुष्काळी स्थितीत शेतकरी, दुष्काळग्रस्तांसाठी काम करण्याची आहे, याचा सपशेल विसर शिवसेनेला पडला.. खरं तर शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडायचं असेल, तर त्यांनी राम मंदिर नव्हे तर दुष्काळप्रश्नी सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करायले हवेत. पण, सध्याच्या शिवसेनेला जनहिताच्या मुद्द्यांपेक्षा धार्मिक मुद्द्यांवरच राजकारण करायला जास्त रस असल्याचं दिसतंय. पण, वेळ अजूनही गेलेली नाही. त्यामुळं उशीरा का होईना शिवसेनेनं जागी होण्याची गरज आहे. कारण, 2019च्या निवडणूक महाराष्ट्रात अयोध्येचे प्रभूराम राजा नव्हे, तर महाराष्ट्राचा बळीराजा जिंकवणार आहे.  याची आठवण शिवसेनाच नव्हे तर प्रत्येक राजकीय पक्षानं ठेवण्याची गरज आहे.

शरद जाधव, सीनियर प्रोड्युसर, टीव्ही 9 मराठी  

(ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं वैयक्तिक आहेत)