ग्राहकांना मोठा झटका? RBI च्या उपाय योजनानंतरही कर्ज महागणार, कारण तरी काय?
RBI Repo Rate: आरबीआयने एकीकडे रेपो रेट वाढवला आहे. तर बँकिंग व्यवस्थेत 2.5 लाख कोटी रुपयांची रोकड उपलब्ध करून दिली आहे. तरीही गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जदारांना कोणताच दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यांचा EMI कमी होण्याची शक्यता कमीच आहे, काय आहे कारण?

Home Loan, Car Loan Expensive : बँकेकडून गृहकर्ज, कार कर्ज वा वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो दर वाढवला आहे. तर दुसरीकडे बँकिंग व्यवस्थेत 2.5 लाख कोटी रुपयांची रोकड उपलब्ध करून दिली आहे.हे दोन्ही निर्णय एकमेकांविरोधातील वाटतील, पण त्यामागे बाजार व्यवस्थेतील गणित लपलेले आहे. बाजारात खेळते भांडवल उपलब्ध असले तरी ते कर्जदारांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केलेली तजवीज आहे. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचा ग्राहकांना व्याजदर कमी होण्यासाठी कोणताही फायदा होणार नसल्याचे समोर येत आहे.
RBI ने का दिला बँकांना पैसा?
याविषयीच्या वृत्तानुसार, RBI ने 7 ऑक्टोबर 2026 रोजी रेपो रेट मध्ये 0.25 टक्के म्हणजे 25 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यानंतर रेपो रेट 5.50 टक्के इतका झाला. फेब्रुवारी 2023 नंतरची ही पहिली व्याजदर वाढ आहे. त्यानंतर आरबीआयने बँकिंग व्यवस्थेसाठी जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचे नगदी भांडवल, खेळते भांडवल उपलब्ध करून दिले. यामुळे बँकांकडे ग्राहकांना कर्ज देण्यासाठी पैसा उपलब्ध आहे. त्यामुळे कर्ज देण्याच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.
बँकिंग व्यवस्थेला आरबीआयचे टॉनिक
सोप्या शब्दात सांगायचं तर रेपो रेट वाढल्याने बँकांना आरबीआयकडून कर्ज घेताना ते महाग मिळेल. बँका पुढे ग्राहकांना विविध कर्जावर व्याजदर वाढवून कर्ज देईल. पण रेपो दर वाढीमुळे बँकांना कर्ज देण्यासाठी जी रक्कम लागणार आहे, त्यासाठीचा खर्च वाढेल. पण बँकिंग व्यवस्थेवर ताण येवू नये आणि विना अडथळा त्यांना ग्राहकांना कर्ज पुरवठा करता यावा यासाठी जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. बँकांकडे पैसा आला म्हणजे कर्ज स्वस्त होईल असा त्याचा अर्थ होत नाही.
गृहकर्ज, वाहन कर्ज महागणार?
रेपो दरात वाढ होण्याचा परिणाम फ्लोटिंग दराच्या कर्जावर दिसेल. कारण या कर्जावरील व्याजदर वेळोवेळी बदल राहते. जर तुम्ही फ्लोटिंग रेटवर वाहन, गृहकर्ज घेतले असेल तर व्याज दर वाढीचा ईएमआयवर परिणाम होईल. तुमचा मासिक हप्ता वाढेल. आता पुढील पतधोरण समितीच्या बैठकीतही ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. पुढील वर्षात नवीन रेपो दर धोरण ठरवले जाईल. पण महागाईचा आलेख पाहता, ग्राहकांचा ईएमआय कमी होण्याची शक्यता कमी असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत.