Indian Railway : एक छोटासा बदल आणि रेल्वेने कमवले तब्बल 2,800 कोटी रुपये

Indian Railway Income : भारतीय रेल्वेने नियमात एक बदल केला आणि करोडो रुपये कमवले आहेत. रेल्वेला हा छोटा नियम बदल करुन तब्बल २८०० कोटींचा नफा झाला आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे.

Indian Railway : एक छोटासा बदल आणि रेल्वेने कमवले तब्बल 2,800 कोटी रुपये
| Updated on: Sep 20, 2023 | 5:22 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने एक छोटासा बदल केला आणि सात वर्षांत तब्बल 2,800 कोटी रुपयांची कमाई केली आहे. असा कोणता बदल रेल्वेने केला आहे. ज्यामुळे इतका मोठा नफा झालाय. हा बदल प्रवास करणाऱ्या मुलांशी संबंधित नियमात करण्यात आला होता.  त्यामुळे 2022-23 मध्ये 560 कोटी रुपयांची कमाई रेल्वेने केली आहे. रेल्वे मंत्रालयाने 31 मार्च 2016 रोजी नियमात बदल केला होता. ज्यामध्ये 5 वर्षे ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना जर राखीव कोचमध्ये स्वतंत्र बर्थ किंवा सीट आवश्यक असेल तर त्यांना पूर्ण भाडे आकारले जाईल.

सात वर्षांत 2,800 कोटी रुपये

रेल्वेच हा नियम 21 एप्रिल 2016 पासून लागू झाला होता.  माहितीचा अधिकारात आता असे समोर आले की, या बदलामुळे रेल्वेने तब्बल सात वर्षांत 2,800 कोटी रुपये कमावले आहेत. CRIS ही रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत, तिकीट आणि प्रवासी हाताळणी, मालवाहतूक सेवा, रेल्वे वाहतूक नियंत्रण आणि ऑपरेशन्स यासारख्या मुख्य क्षेत्रांमध्ये IT उपाय प्रदान करते.

आधी काय नियम होता

21 एप्रिल 2016 पूर्वी 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना अर्धे तिकीट आकारले जात होते. आणखी एक पर्याय होता की जर मुलाने स्वतंत्र बर्थ घेण्याऐवजी सोबतच्या प्रौढ व्यक्तीच्या बर्थवर प्रवास केला तर त्याला अर्धे भाडे द्यावे लागेल. आरटीआय अंतर्गत मागवलेल्या माहितीमध्ये CRIS ने म्हटले आहे की, गेल्या सात वर्षांत 3.6 कोटींहून अधिक मुलांनी आरक्षित सीट किंवा बर्थचा पर्याय न निवडता अर्धे भाडे देऊन प्रवास केला. दुसरीकडे, 10 कोटींहून अधिक मुलांनी स्वतंत्र बर्थ किंवा सीट निवडली आणि पूर्ण भाडे दिले आहे.

70 टक्के मुलांनी भरले पूर्ण भाडे

आरटीआयमध्ये अशी माहिती पुढे आली की, रेल्वेने प्रवास करणाऱ्या एकूण मुलांपैकी सुमारे 70 टक्के मुलांनी पूर्ण भाडे भरून बर्थ किंवा सीट घेण्यास प्राधान्य दिले. CRIS ने 2016-17 ते 2022-23 या आर्थिक वर्षातील मुलांच्या दोन श्रेणींसाठी भाडे पर्यायांच्या आधारे आकडेवारी दिली आहे.

भारतीय रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 2.40 लाख कोटींचा विक्रमी महसूल कमवला आहे. असे रेल्वे मंत्रालयाने वार्षिक कामगिरीचे आकडे जाहीर करताना जाहीर केले.