Milk Price Hike : दिवाळी संपताच सर्व सामान्यांना मोठा झटका, मदर डेअरीनंतर अमूलचे दूध महागले, नवे दर काय?

Milk price hike : दिवाळी संपल्यानंतर आता दूध उत्पादक कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चावर परिणाम होणार आहे. टोंड मिल्क, फुल क्रीम आणि म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवे दर जाणून घ्या..

Milk Price Hike : दिवाळी संपताच सर्व सामान्यांना मोठा झटका, मदर डेअरीनंतर अमूलचे दूध महागले, नवे दर काय?
milk price hike
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 11, 2026 | 7:57 PM

दिवाळीनंतर सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक फटका बसला आहे. आधी मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली आणि आता अमूलनेही दूध महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 नोव्हेंबर म्हणजे उद्यापासूनच अमूलचे हे नवे दर लागू होणार आहेत. अमूलने वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाच्या किमतीत 2 ते 4 रुपयांची वाढ केली आहे. तर मदर डेअरीने 2 ते 6 रुपये प्रति लिटरपर्यंत दर वाढवले आहेत. त्यामुळे आता रोजच्या वापरातील दूध खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

अमूलच्या कोणत्या दुधाचे दर किती रुपयांनी वाढले?

अमूलने आपल्या प्रमुख पॅकबंद दुधाच्या किमतीत 4 ते 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्ये अमूल ताजा म्हणजेच टोन्ड दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अमूल गोल्ड म्हणजेच फुल क्रीम दूध आता प्रति लिटर 4 रुपयांनी महागणार आहे. हे नवे दर 12 नोव्हेंबरपासून लागू होतील.

Loading...

मदर डेअरीचे दूधही महागले

मदर डेअरीनेही ग्राहकांना दरवाढीचा झटका दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बल्क व्हेंडिंग मशीनमधून मिळणाऱ्या टोन्ड दुधाचा दर 58 रुपयांवरून 60 रुपये झाला आहे. फुल क्रीम पॅकबंद दूध 72 रुपयांऐवजी 76 रुपये प्रति लिटर मिळेल. पॅकबंद टोन्ड दुधाचा दर 60 वरून 62 रुपये झाला आहे. डबल टोन्ड दूध 54 वरून 56 रुपये, तर गायीचे दूध 62 वरून 65 रुपये झाले आहे. म्हशीच्या फुल क्रीम दुधाचा दर 80 वरून 86 रुपये प्रति लिटर झाला आहे.

दूध महागण्यामागचे नेमके कारण काय?

पशुखाद्य, चारा, पॅकेजिंग साहित्य आणि इंधनाच्या किमती वाढल्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यातच दुधाचा पुरवठाही कमी झाला आहे. गेल्या काही महिन्यांत दुधातील फॅटच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्यांना दूध खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा आणि दूध संकलन वाढावे, यासाठीही खरेदीचे दर वाढवण्यात आले आहेत. या वाढलेल्या खर्चाचा परिणाम आता थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us