Bollywood Actor : बॉलिवूडचा एकमेव अभिनेता, ज्याला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार! सोनाली कुलकर्णी ठरलेली सर्वोत्कृष्ट अभिनेता
Bollywood Actor : बॉलिवूडचा असा एकमेव अभिनेता होता, ज्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला.

चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार असतात, जे आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करतात. अशाच प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक म्हणजे निर्मल पांडे. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच रंगभूमीवरही स्वतःची छाप उमटवली. मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील एक खास गोष्ट अनेकांना आजही माहीत नाही. निर्मल पांडे हे बॉलिवूडमधील असे एकमेव पुरुष अभिनेते होते, ज्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
ट्रान्सजेंडरची भूमिका साकारून पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
निर्मल पांडे यांनी 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमोल पालेकर दिग्दर्शित ‘दायरा’ या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. त्यांच्या याच भूमिकेसाठी 1997 मध्ये फ्रान्समधील व्हॅलेन्सिएन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, याच चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी होती. यात एका मुलीला मुलगा व्हायचं असतं, तर एका मुलाला मुलगी व्हायचं असतं. चित्रपटातील भूमिकांनुसार निर्मल पांडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर सोनाली कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता.
राजकुमार पांडे ते निर्मल पांडे असा प्रवास
निर्मल पांडे यांचा जन्म 10 ऑगस्ट 1962 रोजी उत्तराखंडमधील नैनीताल येथे झाला. त्यांचं मूळ नाव राजकुमार पांडे असं होतं. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. शाळेत असताना ते रामलीला आणि विविध नाटकांमध्ये आवर्जून सहभागी व्हायचे. अल्मोडा आणि नैनीताल येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ते दिल्लीला गेले.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये घेतलं अभिनयाचं शिक्षण
दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) येथे त्यांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. या काळात त्यांनी नाटकांचं दिग्दर्शनही करण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते लंडनला गेले. तिथे एका नाट्यसंस्थेशी जोडले गेले आणि जवळपास 125 नाटकांमध्ये काम केलं. ‘हीर रांझा’ आणि ‘अँटीगोन’ यांसारख्या नाटकांमधील त्यांच्या अभिनयाला परदेशातील प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळाली.
‘बँडिट क्वीन’मुळे मिळाली बॉलिवूडमध्ये ओळख
शेखर कपूर यांच्या ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटामुळे निर्मल पांडे यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी फुलन देवीच्या पतीची, विक्रम मल्लाची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. यानंतर त्यांना ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘इस रात की सुबह नहीं’, ‘हम तुम पे मरते हैं’, ‘लैला’, ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘शिकारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
केवळ चित्रपटच नव्हे, तर छोट्या पडद्यावरही निर्मल पांडे यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘हातिम’ आणि ‘प्रिन्सेस डॉली अँड हर मॅजिक बॅग’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच त्यांना संगीताचीही आवड होती. 2002 मध्ये त्यांनी ‘जज्बा’ हा म्युझिक अल्बम प्रदर्शित केला होता. मात्र, या गुणी अभिनेत्याची कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही. 18 फेब्रुवारी 2010 रोजी वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं.
