
नवी दिल्ली- शेअर बाजारातील तेजी-घसरणीच्या गणिताचा अंदाज लावणं कठीण असतं. काही स्टॉक्स सरस कामगिरीचे ठरतात. संभाव्य कामगिरीवर शेअर बाजारातील दिग्गज प्रस्थ डाव लावतात. दलाल स्ट्रीटचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून ख्यातकीर्त असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Portfolio)यांच्या गंगाजळीत मोठी भर पडली आहे. गेल्या एक महिन्यांत शेअर्सच्या किंमतीमुळे कोट्यावधींची उड्डाणे पार केली आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील स्टार हेल्थ (Star health) आणि मेट्रो ब्रँड (Metro brands) यांच्या दमदार कामगिरीमुळे कमाईत 832 कोटी रुपयांची भर पडली आहे. गेल्या महिन्यांत दोन्ही स्टॉक्सची दमदार कामगिरी दिसून आली आहे.
एका महिन्यांत स्टार हेल्थ शेअरची (Star Health Share price)किंमत प्रति शेअर 686.60 रुपयांवरुन 741.10 वर पोहोचली आहे. शेअरमध्ये सरासरी 54.50 रुपयांची तेजी दिसून आली. तर, मेट्रो ब्रँड्सच्या शेअरचा भाव (Metro Brands share price) 531.95 रुपयांवरुन 604 रुपयांवर पोहोचला. साधारण 72.05 रुपये प्रति शेअरची तेजी दिसून आली.
दोन्ही स्टॉक्समधील तेजीमुळे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala)यांच्या गंगाजळीत 832 कोटी रुपयांची भर पडली. झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थमध्ये 17.50% भागीदारी आहे. शेअरच्या किंमतीत 54.50 रुपयांची वाढ झाली. एकूण खरेदी शेअर्सची संख्या 10,07,53,935 आहे. एक महिन्याच्या तेजीनंतर राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत 550 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. (54.50 रुपये x10,07,53,935 शेअर= 5491089457.5 रुपये)
राकेश झुनझुनवालांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या ट्रस्ट कडे मेट्रो ब्रँडचे एकूण 3,91,53,600 शेअर आहेत. गेल्या एक महिन्यांत शेअरच्या किंमतीत 72.05 रुपयांची वाढ नोंदविली गेली. गेल्या एक महिन्यात तब्बल 282 कोटींचा नफा झाला. (72.05 रुपये x 3,91,53,600= 2821016880 रुपये)
राकेश झुनझुनवाला अकासा एअर लाईन्सचे सर्वेसर्वा आहेत. आगामी 5 वर्षांमध्ये एअरलाईन्सकडे 72 विमानं उड्डाणासाठी सज्ज असतील अशी माहिती आहे. वाहतूक सुरू होण्यापूर्वीच 12 महिन्याची योजना 18 विमानं उड्डाणा साठी सज्ज करण्याची आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी एअरलाइन 12 ते 14 विमान नव्याने उड्डाणासाठी तयार ठेवेल अशी योजना आखण्यात येत आहे.